अमरावती : उन्हाळ्याचे आणखी अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, मार्च अखेरीस अमरावती विभागातील मोठी धरणे निम्म्याच्याही खाली गेली आहेत. ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा ४५.६७ टक्के पाणीसाठा राहिलेला आहे. यामुळे नागरी वस्‍त्‍यांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. विभागातील मोठ्या, मध्‍यम आणि लघु प्रकल्‍पांमध्‍ये ४२.७६ टक्‍के पाणीसाठा आहे.

यंदा पुरेसा पाऊस होऊनही मार्चअखेर अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४५.६७ टक्के म्‍हणजे ६३९.३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात या मोठ्या धरणांमध्ये ६६२ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. त्यात आठवडाभरातच २३ दशलक्ष घनमीटरची घट होऊन ६३९ दशलक्ष घनमीटर साठा शिल्‍लक आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी बेंबळा, काटेपूर्णा प्रकल्‍पांमध्‍ये ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

अमरावती विभागात एकुण नऊ मोठे प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील अप्परवर्धा जलाशयात अद्याप ५२.८९ टक्के जलसाठा शिल्लक असला, तरी पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा कमालीचा घटला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस, अरुणावती व बेंबळा प्रकल्पात अनुक्रमे ४६.८२ टक्के, ४३.१५ टक्के, ३७.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ५४.६९ टक्के जलसाठा असला, तरीही काटेपूर्णा प्रकल्पात केवळ ३१.८५ टक्केच पाणी शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवली होती यंदा स्थिती बरी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा जलाशयात ५५.५८ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ५२.२४ टक्के जलसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्‍पात १५.१४ टक्‍के पाणीसाठा आहे.

विभागातील २७ मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये ३७१ दलघमी म्‍हणजे ४८.०८ टक्‍के जलसाठा आहे, तर २५३ लघु प्रकल्‍पांमध्‍ये ३१६.१८ दलघमी म्‍हणजे ३३.९७ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. उन्‍हाच्‍या झळा आता जाणवायला लागल्‍या असून वाढत्‍या उष्‍णतामानामुळे बाष्पिभवनाचा वेग वाढला आहे. सिंचनासह घरगुती वापराच्‍या पाण्‍याची मागणी वाढली आहे. अमरावती जिल्‍ह्यातील एकूण ५६ प्रकल्‍पांमध्‍ये ५०.६२ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. यवतमाळ जिल्‍ह्यातील ७४ प्रकल्‍पांमध्‍ये ४१.२७ टक्‍के, अकोला जिल्‍ह्यातील ३० प्रकल्‍पांमध्‍ये ३८.९३ टक्‍के, वाशीम जिल्‍ह्यातील ७८ प्रकल्‍पांमध्‍ये ३३.७० टक्‍के तर बुलढाणा जिल्‍ह्यातील ५१ प्रकल्‍पांमध्‍ये ३७.८३ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे.

उन्‍हाळ्यात नागरिकांना पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला व विभागातील शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र आता मार्च महिन्‍याच्‍या अखेरीस धरणांतील पाणीसाठा निम्‍म्‍यावर आला आहे. पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंत याच पाणीसाठ्यावर विभागातील शहरांची मदार असणार आहे.