अमरावती : जिल्‍ह्यातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीसह सहा बाजार समित्‍यांच्‍या संचालक मंडळाच्‍या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून १०८ संचालकपदांसाठी २७३ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्‍यांच्‍या भाग्‍याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत खासदार, आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या नेतृत्‍वात महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी सहकार पॅनेलच्‍या माध्‍यमातून वर्चस्‍व प्रस्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न चालवला असतानाच खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, सहकार नेते विलास महल्‍ले आणि भाजपच्‍या नेत्‍यांनी शेतकरी पॅनेलच्‍या माध्‍यमातून त्‍यांना आव्‍हान दिले आहे. अमरावतीसह चांदूर रेल्‍वे, नांदगाव खंडेश्‍वर, मोर्शी, तिवसा आणि अंजनगाव सुर्जी या सहा बाजार समित्‍यांमध्‍ये ही निवडणूक होत आहे. एकूण ३५ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू असून मतदारांमध्‍ये उत्‍साह दिसून येत आहे. भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे,  आमदार प्रताप अडसड यांच्‍यासाठी देखील बाजार समित्‍यांची निवडणूक महत्‍वाची बनली आहे. यावेळी राजकीय हस्‍तक्षेपाने ही निवडणूक गाजण्‍याचे संकेत आधीच मिळाले होते.

हेही वाचा >>> वाशीम, मानोरा बाजार समितीत दुपारपर्यंत ४६ टक्के मतदान

अमरावतीत शिवसेनेच्‍या ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्‍या विरोधात जाऊन वेगळी चूल मांडली. त्‍याचा कितपत परिणाम दिसून येतो, हे लवकरच स्‍पष्‍ट होणार आहे. या गटाले बळीराजा पॅनलद्वारे उमेदवार रिंगणात आणले. अमरावती बाजार समितीच्‍या निवडणुकीत १८ संचालकपदांसाठी ५४, नांदगाव खंडेश्वरमध्‍ये ४९, चांदूर रेल्‍वेत ३६, तिवसा ३८, अंजनगाव सुर्जी ४७ आणि मोर्शी बाजार समितीमध्‍ये ४९ उमेदवार रिंगणात आहेत. सांयकाळी ४ वाजता मतदान आटोपणार आहे, सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अमरावती बाजार समितीची मतमोजणी २९ एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यात अचलपूर,  दर्यापूर, चांदूर बाजार, धामणगाव रेल्‍वे, धारणी आणि वरूड या बाजार समित्‍यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market committees election of amravati district the reputation of mps and mlas mma 73 ysh
Show comments