पावसामुळे झालेली नापिकी, वस्तूंच्या वाढलेल्या किंमती यामुळे गणेशोत्सवाच्या काळात बाजारात मंदीचे सावट दिसून येत आहे. पंरपरेनुसार गणेशोत्सव साजरा केला जातो आहे, पण या काळात खरेदीत दिसून येणारा उत्साह पाहायला मिळत नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दहा दिवस चालणारा हा उत्सव गणेशभक्तांच्या आस्थेचा विषय आहे. दोन घरा आड होणारी ‘श्री’ची प्रतिष्ठापना आणि प्रत्येक मोहल्ला आणि सोसायटीत सार्वजनिक मंडळांकडून साजरे होणारे उत्सव तसेच यानिमित्ताने होणारे विविध कार्यक्रम, सजावटी, देखावे यामुळे एकूणच उत्साहाचे वातावरण सर्वत्र निर्माण होते. याचे प्रतिबिंब बाजारातही दिसून येते. त्यामुळे गणेशभक्तांसोबत व्यापारीही या उत्सवाच्या प्रतीक्षेत असतात. मात्र अलीकडच्या काळात सातत्याने वाढत चाललेल्या महागाईचा फटका या उत्सवाला बसला आहे. मूर्तीपासून प्रसादापर्यंत आणि सजावटींच्या सर्वच वस्तूंच्या किंमती अनेक पटींनी वाढल्याने त्याचा परिणामही बाजारपेठेतील उलाढालीवर झाल्याचे व्यापारी सांगतात.
दरवर्षी मूर्तीच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी वाढते. यासाठी लागणारा रंग, इतर साहित्य आणि इतरही खर्चात झालेली वाढ हे कारण मूर्ती विक्रेते देतात. बाहेरगावहून शहरात मूर्ती आणण्याचाही खर्च मोठा आहे, याकडे विक्रेते लक्ष वेधतात. खरेदीदार मूर्तीसाठी विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवतात. तेवढय़ाच रकमेत त्यांना अपेक्षित मूर्ती मिळाली नाही तर त्यांचा अपेक्षा भंग होतो. मूर्तीवर खर्च वाढला तर त्याची भरपाई इतर खर्चातून केली जाते, असे धंतोलीतील विक्रेते वीरेंद्र बोरसरे यांनी सांगितले.
किरणा व्यापारी चंदन गोस्वामी यांनीही महागाईमुळे बाजारातील उत्सव संपला, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले पूर्वी ५ रुपयात नारळ मिळत होता आता त्यासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागतात. शेंगदाणे ४० रुपये किलो वरून १०० रुपये किलो झाले आहेत. प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची स्थिती अशीच आहे. सुखा मेवा दहा वर्षांत तीन पटीने महागला आहे. ३०० रुपये किलो काजू ९०० रुपये किलोने विकला जात आहे. बदाम ८०० रुपये किलो झाली आहे. ग्राहकांची गर्दी बाजारात होत असली तरी खरेदी त्या तुलनेत होत नाही. उत्सवाबाबत केवळ औपचारिकता उरली आहे. व्यावसायिक क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा वषार्ंपूर्वी नागपुरातच गणेशोत्सवाच्या काळात २५ टक्के विक्रीत वाढ होत होती. त्यात कापडापासून तर सोनं-चांदीच्या वस्तूंचाही समावेश होता. आता तसे चित्र नाही. नाही म्हणायला दुचाकी, चार चाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, कपडय़ांसाठी विविध कंपन्या विशेष ‘ऑफर्स’ची घोषणा करतात. मात्र त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा