नागपूर : पत्नी बाळंतपणासाठी माहेरी जाताच पतीचे मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर पतीच्या अनैतिक संबंधाचा उलगडा झाला. त्यामुळे दोघांचाही संसार विस्कळीत झाला. अवघ्या आठ दिवसांच्या बाळासह पत्नी रडतच भरोसा सेलमध्ये आली. परंतु, हा भावनिक गुंता भरोसा सेलने अलगद सोडवल्याने रडत आलेली पत्नी पतीच्या दुचाकीवरून हसत घरी परतली.
स्विटी (२२) ही उच्चशिक्षित तरुणी मुंबईत एका नामांकित दूरचित्र वाहिनीसाठी ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करीत होती. ती मूळची महालातील. नातेवाईकांच्या माध्यमातून सुशांत (सक्करदरा) या युवकाचे स्थळ आले. तो पूर्वी पुण्यात एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर होता. करोनानंतर त्याने नागपूर गाठले. एका फार्मा कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळवली. त्याने स्विटीला नोकरी सोडण्याची अट ठेवली. स्विटीनेही आपल्या संसारासाठी नोकरीचा त्याग केला. एप्रिल २०२२ मध्ये दोघांचे लग्न झाले. काही दिवसांनी स्विटी बाळंतपणासाठी माहेरी निघून गेली. यादरम्यान, सुशांतचे मामाच्या अविवाहित मुलीशी सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दरम्यान, सुशांतच्या दोन्ही मोठ्या भावंडांना लग्नाच्या दहा वर्षांनंतरही मुलबाळ झाले नाही. त्यामुळे सुशांतचे बाळ हे कुटुंबातील पहिलेच बाळ आहे. मात्र, सुशांतचा मामाच्या मुलीवर जीव जडल्यामुळे कुटुंबाच्या आनंदावर विरजन पडले. पतीच्या अनैतिक संबंधाबाबत स्विटीला माहिती मिळाली. पतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या प्रेमात वेडा झाल्याची कबुली तो देत होता. संसार विस्कटल्याचे बघून स्विटीने आठ दिवसांच्या बाळासह भरोसा सेलमध्ये धाव घेतली.
मामाच्या मुलीलाही चूक उलगडली
स्विटीने पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांची भेट घेत आपबिती सांगितली. सुर्वे यांनी स्विटीला धीर दिला. पोलिसांनी सुशांतला बोलावून घेतले. त्याला पत्नी, बाळ आणि संसार याबाबत समुपदेशन केले. तसेच मामाच्या मुलीची समजूत घातली. एका चुकीच्या निर्णयामुळे कुणाच्या संसाराची माती होत असल्याचे तिच्या लक्षात आणून दिले. सुशांत आणि त्याच्या मामेबहिणीने स्विटीची माफी मागितली. भरोसा सेलमधूनच दाम्पत्य आनंदाने बाळासह आपल्या घरी निघून गेले.