लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : एका दहावीत शिकणाऱ्या मुलीचे ३० वर्षीय तरुणासोबत लग्न ठरले होते. आठवड्यावर लग्न असल्यामुळे लग्न घरी तयारी सुरू होती. अचानक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईन संस्थेच्या सदस्यांसह पोलीस लग्नघरी पोहचले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले तर तिच्या आईवडिलांचे समुपदेशन करून विवाह सोहळा थांबवला.

धंतोली परिसरात राहणाऱ्या गरीब दाम्पत्याच्या १६ वर्षीय मुलीला पाचगाव येथील एका मजूर असलेल्या ३० वर्षीय तरुणाचे स्थळ आले. मुलीचे लग्न करून जबाबदारीतून मुक्त होण्याच्या उद्देशाने आणि वर मुलगाही व्यवस्थित कमाई करीत असल्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी लग्नास होकार दिला. दोघांचाही विवाह सोहळा काही दिवसांवर असताना २२ जूनला बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, साधना ठोंबरे, पीएसएए या चाईल्ड लाईन संस्थेच्या पूजा कांबळे, मीनाक्षी धडाडे, सुनीता नागदेवे, रूपाली पातूरकर आणि धंतोलीच्या ठाणेदार प्रभावती एकुरके, उपनिरीक्षक वैभव भगत हे वधूपित्याच्या घरी पोहचले.

आणखी वाचा-खबरदार! कमी वयात दुचाकी चालवल्यास पंचविसव्या वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना नाही

त्यांनी सर्वप्रथम वधू असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. तिचे आधारकार्ड आणि प्रवेशाचा दाखला तपासला. तिचे वय १६ वर्षे काही महिने असल्याचे लक्षात येताच तिच्या आईवडिलांची अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी आणि शिक्षा याबाबत तिच्या पालकांना अवगत केले. त्यांचे समुपदेशन करीत बालविवाह रोखण्यात आला. जिल्हा प्रशासनाला गेल्या पाच महिन्यात ७ बालविवाह रोखण्यात यश आले, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage of minor girl prevented adk 83 mrj