लोकसत्ता टीम

नागपूर : विवाहित महिलेचे दोन वर्षांपासून असलेले अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर तिच्या पतीने पत्नीला मारहाण आणि मानसिक शारीरिक त्रास देणे सुरु केले. पतीच्या छळाला कंटाळलेल्या प्रेयसीने प्रियकराकडे आपली व्यथा व्यक्त केली. प्रियकराने थेट प्रेयसीच्या पतीचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना पाचपावलीत घडली. शेरा (३२, पाचपावली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर रजत ऊर्फ गीतेश उके (३२, नाईक तलाव) आणि भोजराज कुंभारे (३४, नाईक तलाव) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरा हा पत्नी अरुणा (काल्पनिक नाव) व दोन मुलांसह राहत होता. तो महापालिकेत स्वच्छता कर्मचारी पदावर कार्यरत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्यामुळे पत्नी त्याला कंटाळली होती. यादरम्यान, शेराच्या पत्नीची आरोपी रजत ऊर्फ गीतेश कमलेश उके याच्यासोबत इंस्टाग्रामवरुन ओळख झाली. रजत हा विवाहित असून त्याला सहा वर्षांची मुलगी आहे. तो अॅक्वागार्ड कंपनीत नोकरी आहे.

अरुणाला इंस्टाग्रामवर रिल्स बनविण्याची सवय होती. रजत हा अरुणाच्या रिल्सवर नेहमी कमेंट करीत होता. त्याच्या कमेंटला अरुणा उत्तरही देत होती. यातूनच दोघांची मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला लागले. दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. यादरम्यान अरुणा आणि रजत एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही विवाहित असल्याचे विसरुन प्रेमसंबंध ठेवत होते. पती घरी नसल्यास रजत थेट तिच्या घरी जात होता. तीसुद्धा बिनधास्तपणे रजतसोबत फिरायला जात होती. दोघांनीही प्रेमाच्या सीमा ओलांडल्या. पती दारु पिऊन नेहमी मारहाण करीत शारीरिक त्रास देत असल्याची तक्रार अरुणा नेहमी प्रियकर रजतकडे करीत होती.

प्रेमातील अडसर केला दूर

प्रेयसीला होणारा त्रास रजतला सहन होत नव्हता. त्यामुळे त्याने प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्याचे ठरविले. रविवारी रात्ररी रजत हा मित्र भोजराज कुंभारे याच्यासोबत शेराच्या घराकडे निघाला. नंदगिरी रोडवर दुचाकीने जात असलेल्या शेराला थांबवले. त्याच्यावर दोघांनीही चाकूने हल्ला केला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर पळ काढला.

दोन्ही आरोपींनी तासाभरात अटक

शेराचा खून केल्यानंतर दोनही आरोपींनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत यांनी दोन पथके नियुक्त करुन दोन्ही आरोपींना तासाभरात अटक केली. प्रेयसीला नेहमी मारहाण करीत असल्यामुळे तिच्या पतीचा खून केल्याची कबुली आरोपी रजतने दिली. यापूर्वी रजत आणि शेरा यांच्यात वाद झाला होता. ‘माझ्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध तोडून टाक आणि माझ्या पत्नीच्या नादाला लागल्यास जीवंत सोडणार नाही,’ अशी धमकी शेराने दिली होती. त्यामुळे शेराचा खून केल्याची कबुली आरोपी रजतने पोलिसांना दिली.