बुलढाणा :  विवाहित  युवकाने अन्य महिलेवर प्रेम जडले, प्रेयसीचा प्रतिसाद असल्याने आणि (बायकोची हरकत नसल्याने ) त्याने तिला घरीच आणले. हा आगळा वेगळा प्रेमवीर आपली पहिली बायको, प्रेमिका सह एकाच घरात ‘नांदू’ लागले. मात्र जिच्यावर जीवापाड प्रेम (!) केलं ती प्रेमिका सोडून गेली. तिचा विरह सहन न झाल्याने या प्रेमाविराने विष प्राशन करून आत्महत्या केली. साधीसुधी नव्हे तर इंस्टाग्राम वर हे सर्व ‘शेअर’ करीत जगाचा निरोप घेतला…

प्रेयसी सोडून गेली म्हणून प्रियकराने तिच्या विरहात  विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक अजब गजब प्रकार  समोर आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे ही  घटना घडली.यामुळे  वर्दडी बुद्रुक सह संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यात खळबळ उडाली आहे. समाधान आटोळे (२५) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमवीराचे नाव आहे.

समाधान आटोळे याचे लग्न झालेले आहे. पत्नी देखील त्याच्यासोबतच राहत होती. दरम्यान अशातच सिंदखेडराजा तालुक्यातीलच एका गावातील २८ वर्षीय विवाहितेवर त्याचे मन जडले. तो तिच्या प्रेमात पडला, नुसता पडला नाही तर वेडापिसा झाला. लग्नाची पत्नी असताना देखील त्या विवाहित प्रेयसीला सोबत घेऊन घरी आला. नवरा, बायको  आणि ‘ नवऱ्याची बायको ‘ असे तिघेही ते एकाच घरात एकत्र राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून समाधान त्याची प्रेयसी आणि पत्नी असे एकत्र राहत होते. हा त्रिकोणी संसार दोन महिने चालला. या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली(!) कुणास ठाऊक पण प्रियकर व प्रेयसी मध्ये काहीतरी बिनसले.

इंस्टाग्राम अन आत्महत्या

दरम्यान १३ मार्चच्या सायंकाळी त्याची प्रेमिका काहीही न सांगता घरातून निघून गेली. त्यामुळे तो अस्वस्थ झाला.१३ मार्चपासून तो सातत्याने दारू पीत होता. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी उशिरा केशवशिवनी ते दुसरबीड मार्गावर त्याने प्रेयसीला उद्देशून इंस्टाग्राम वर एक दुःखी गाण्याचा व्हिडिओ शेअर केला..हा व्हिडिओ सुरू असताना त्याने लाइव्ह विष प्राशन करून आत्महत्या केली.

जहाल विष घेतल्यानंतर तो बेशुद्ध पडलेला होता. याची माहिती कुटुंबीयांना  झाल्यावर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्यवस्थ अवस्थेत समाधान ला रुग्ण वाहिकेद्वारे सिंदखेड राजा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित  केले. या अजब प्रेमाच्या अंताची सिंदखेड राजा तालुकाच नव्हे जिल्ह्यात उलट सुलट चर्चा होत आहे…

Story img Loader