नागपूर : एकाच कार्यालयात नोकरी करताना झालेल्या प्रेमप्रकरणातून विवाहित प्रियकराने प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर ते छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीचे तीन वर्षे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आशीष घनश्याम लद्दड (४०, सातुरना, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा >>> मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या पतीसाठी पत्नीचा संघर्ष!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय तरुणी उच्चशिक्षित असून नागपुरातील एका कार्यालयात नोकरी करीत होती. तेथे आरोपी आशिष लद्दड हासुद्धा नोकरी करीत होता. दोघांचेही कार्यालयीन काम करताना सूत जुळले. त्याने अविवाहित असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कार्यालयाच्या दौऱ्यानिमित्त दोघेही बाहेर गेले असताना त्याने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०१८ पासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. काही महिन्यांपासून ती लग्न करण्याचा तगादा आशिषकडे लावत होती. मात्र, तो लग्नासाठी टाळाटाळ करीत होता. फेब्रूवारी महिन्यात तरुणी त्याच्या खोलीवर अचानक गेली असता त्याला एक महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह दिसली. तिला विचारणा केली असता तिने आशिषची पत्नी असल्याचे सांगितले. त्यामुळे आशिष विवाहित असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्यामुळे तिने त्याला जाब विचारला. त्याने तरुणीला भ्रमणध्वनीमध्ये काढलेले तिचे अश्लील छायाचित्र दाखवले. ते छायाचित्र फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकण्याची त्याने धमकी दिली. अश्लील छायाचित्र दाखवून त्याने तरुणीचे लैंगिक शाेषण सुरू केले. त्याला कंटाळून तिने नोकरी सोडली आणि अन्य एका युवकाशी लग्न करण्यासाठी तयार झाली. मात्र, आशिष तिला लग्न केल्यास अश्लील छायाचित्र होणाऱ्या पतीला पाठविण्याची धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली