यवतमाळ : त्यांचा संसार सुखात सुरू असताना सोशल मीडियाची नजर लागली आणि सारेच विस्कटून गेले. दोन मुलांची आई आपल्या एका मुलाला घेऊन ‘एफबी फ्रेंड’कडे नांदायला गेली आणि सर्वस्वासोबतच पतीने तिच्या खात्यात जमा केलेली पै न पै गमावून आली. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना यवतमाळ येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सत्य कथेत सोशल मीडियावरून प्रेम, धोखा आणि विश्वास याची गुंफण आहे. दोन मुलांची आई नवऱ्याला सोडून दोन अपत्यांपैकी एका अपत्याला घेऊन प्रियकरापाशी पोहोचली. तिच्या खात्यात बँक बॅलन्स असेपर्यंत काही दिवस सुखाचे गेले. गोड बोलून प्रियकाराने तिच्या खात्यातील पाच लाख रुपये काढून घेतले. तिचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे दागिने विकले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. पैश्याकरिता तिला वारंवार त्रास आणि मारझोड करणे सुरू केले. या कथेत अखेर पतीच तिच्या मदतीसाठी धावून आला. तिने हिंमत एकवटून मोबाईलवरून पतीस आपबिती सांगितली. नवऱ्याने तिला मोठ्या मनाने माफ करून पोलिसांच्या मदतीने घरी परत आणले.

हेही वाचा – चंद्रपूर : दीक्षाभूमीवर अवतरली निळाई, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याला सुरुवात

सोशल मीडियामुळे सध्या जग मुठीत आले आहे. सोशल मीडिया डेटिंगमधून हा प्रकार घडला. सध्या डेटिंग अ‍ॅप्सपेक्षा फेसबुक आणि इन्टाग्रामवरील डेटिंग वाढू लागले आहे. यवतमाळ येथे एका तरुण दाम्पत्याचा संसार सुखाने चालला होता. विक्रम (बदललेले नाव) आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्याकरिता अतोनात कष्ट घेत होता. नवरा आणि मुले बाहेर गेल्यावर फावल्या वेळात पत्नी रुपाली (बदललेले नाव) सोशल मीडियाचा वापर करीत होती. अशातच फेसबुकवर तिची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आनंद (बदललेले नाव) याच्याशी ओळखी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. रुपाली त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. शेवटी तिने पतीचे प्रेम आणि विश्वासाचे नाते तोडत एका अपत्याला घेत थेट श्रीरामपूर गाठले. या बाबीची कल्पना नसलेल्या विक्रमने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आपली पत्नी आणि अपत्यासंदर्भात मिसिंगची तक्रार दिली.

हेही वाचा – राज्यातील पहिला “हत्ती कॅम्प” दुर्लक्षित; परराज्यांतील हत्तींसाठी मात्र लाखोंची उधळण

रुपाली आणि आनंदचे काही दिवस सुखाचे गेलेत. नंतर आनंदने आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली. तिला आनंद पैशासाठी तगादा लावू लागला. विक्रमने आपले छोटे दुकान असावे म्हणून पै-पै जोडत रुपालीच्या खात्यात पाच लाख रुपये मोठ्या कष्टाने जमा केले होते. ते पैसे आनंदने रुपालीच्या खात्यातून जबरदस्ती काढावयास लावले. तिचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील दागिने विकले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. आता रुपालीकडून कोणताही आर्थिक फायदा नसल्याने आनंदने तिला मारझोड करण्यास सुरवात केली. असह्य रुपालीने आपल्या पतीस आपबिती सांगितली आणि घरी घेऊन जाण्याची विनंती केली. विक्रमने मोठ्या मनाने तिला माफ करत घरी परत आणण्याचा निर्णय घेतला. त्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांना घटना सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने पावले उचलीत रुपाली आणि तिच्या अपत्याला यवतमाळ येथे सुखरूप आणले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married woman harassed for money by fb friend incident at yavatmal nrp 78 ssb
Show comments