अकोला : वर्षभर अवकाशात विविध खगोलीय घटना घडत असतात. कधी धुमकेतू दर्शन देतो, कधी उल्का वर्षावाची पर्वणी बघायला मिळते, तर काही वेळा ग्रहाण-सावल्यांचा खेळ सुरु असतो. खगोल प्रेमींसाठी आता आणखी एक अनोखी पर्वणी आहे. आकाशात नुसत्या डोळ्यांनी मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचे दर्शन होणार आहे. अवकाशातील या मनोहरी दृश्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.

हेमंत ॠतूतील गुलाबी थंडीत सध्या सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. अवकाशात ग्रहांच्या दर्शनाची उधळण होत असून खगोल प्रेमींकडून त्याचे हर्षोल्लासात स्वागत केले जात आहे. पश्चिम आकाशात संध्याकाळी सूर्यास्तानंतर सर्वात आधी धनु राशीतील तेजस्वी शूक्र ग्रह आपल्या नजरेस येईल. त्याच्या खाली सर्वात लहान ग्रह बुध क्षितिजावर काही वेळासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत पाहता येणार आहे. हे दोन्ही अंतर्ग्रह असल्याने यांच्या कलासुद्धा पाहता येणार आहेत. अंधाऱ्या भागातून शुक्राच्या प्रकाशात सावल्यासुद्धा दिसतील. रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात सूर्य मालेतील सर्वात मोठा असलेला सध्या वृषभ राशीतील गुरु ग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे. अत्यंत ठळक चांदणीच्या स्वरुपात रोहिणी तारकेजवळ गुरु ग्रह बघता येईल. याच समृद्ध तारकांच्या भागात काही अंतरावर लालसर रंगाचा मंगळ ग्रह कर्क राशी समुहात दर्शन देईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा – महायुतीत यवतमाळला तीन मंत्रिपदांची लॉटरी? संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईकांची नावे…

पूर्व क्षितिजावर गुरु आणि पश्चिम क्षितिजावर शुक्र

पूर्व क्षितिजावरील गुरु आणि पश्चिम क्षितिजावर शुक्र बघताना दक्षिण आकाशात क्षितिजापासून सुमारे ६० अंश अंतरावर सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वलयांकित असलेला शनी ग्रह कुंभ राशीत दिसणार आहे. दुर्बिणीतून गुरु ग्रहाचे आणि शनी ग्रहाचे वलय खुपच सुंदर दिसते. सूर्य, पृथ्वी आणि शनी यांच्यातील स्थितीनुसार शनी ग्रहाचे वलय एका रेषेत आल्याने दोन महिन्यांनंतर वलय काही कालावधीसाठी दिसेनासे होईल, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

हेही वाचा – मंत्रिपदाची पाच वर्षांची प्रतीक्षा संपणार? अकोला जिल्ह्यातून आमदार रणधीर सावरकरांना संधी?

वलय ते नाहिसे होण्याचा प्रवास

सर्वाधिक १४५ उपग्रह असलेल्या शनी ग्रहाचा वलयास ते नाहिसे होण्यापर्यंतचा प्रवास होणार आहे. शनी ग्रह वलयास असताना त्याच्या विलोभनीय दर्शनाचा आनंद घ्यावा, असे प्रभाकर दोड म्हणाले.