वर्धा : छोडो भारत आंदोलनादरम्यान देशात ठिकठिकाणी उठाव झालेत. त्यापैकी आष्टीचा उठाव विशेषत्वाने गाजला. कारण क्रांतिकारकांनी आष्टीच्या पोलीस मुख्यालयावर देशात पहिला तिरंगा झेंडा फडकविला. त्या रणधुमाळीत आष्टीचे सहा क्रांतिकारक शहीद झाले. १६ ऑगस्ट १९४२ ला आष्टी गाव देशात स्वतंत्र झालेले पहिले गाव ठरले. आष्टीचा उठाव १६ ऑगष्ट १९४२ ला झाला. त्या दिवशी नागपंचमी होती म्हणून या गावात नागपंचमीला शहीद स्मृती दिन साजरा होतो.
शहीदवीरांना आदरांजली वाहण्यात येते. देशातील कोणत्याही क्षेत्रातील नामवंत पुढाऱ्यांची दरवर्षी कार्यक्रमाला उपस्थिती राहते. देशातील पंतप्रधानांपासून तर गावच्या सरपंचापर्यंत सर्वचजण आष्टीला आदरांजली वाहण्यासाठी येवून गेलेत. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ९ वाजतापासून जय्यत तयारी सुरू झालेली असते. पाहुणे आले की, प्रथम बाकळी नदीच्या तीरावर असलेल्या शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतात. नंतर क्रांतिस्थळावर (हुतात्मा विद्यालय आष्टी) येतात, तेथे शहीदवीरांच्या व क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन केल्या जाते, अशी माहिती या परिसराचे अभ्यासक वीरेंद्र कडू देतात.
हेही वाचा – नागपूर : प्रेयसी गर्भवती, प्रियकर म्हणतो ‘तो मी नव्हेच..’
हेही वाचा – भाजपा नेत्या सना खान हत्याकांड: अमित शाहू करतोय पोलिसांची दिशाभूल
शहीदवीरांना आणि क्रांतिवीरांना भाषणातून पाहुणे आदरांजली वाहतात. पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. खेड्यापाड्यावरून गावकरी कार्यक्रमाला येतात. हुतात्मा स्मारक समिती हे सर्व आयोजन करते. वेळ ९ ते २ वाजेपर्यंत असते. यावर्षी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात एम. डी. ट्रांस्कोमचे मिलिंद देशमुख, आनंदसागर बोटलिंग प्लांटचे हेमंत ठाकरे, प्रा. गौतम नगदेवते यांचा सत्कार होणार आहे.