विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उपराजधानीत आठ अंश सेल्सिअस तर गोंदियात सर्वाधिक कमी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>रस्ता सुरक्षा समित्यांचा गुंता अखेर सुटला! सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पदनामाबाबत स्पष्टता
विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी होत आहे. तसेच वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्री वारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. गोंदिया आणि नागपूर पाठोपाठ वर्धा व गडचिरोली शहरात ९.४ तर ब्रम्हपुरी येथे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर शहरात देखील किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस आहे. त्यापाठोपाठ अमरावती १०.४, यवतमाळ १०.७, अकोला ११ तर बुलढाणा येथे ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमान आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील थंडी कायम राहील, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.