नागपूर : उपराजधानीतील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली. सर्व शहरातला कचरा याठिकाणी जमा केला जातो आणि वर्षानुवर्षे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे येथे कचऱ्यांचा मोठा डोंगर तयार झाला आहे. मात्र, महापालिकेला अजूनही यावर पर्याय शोधता आलेला नाही. यापूर्वी देखील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये अनेकदा आगी लागल्या आहेत.

शनिवारी दुपारच्या सुमारास भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये भीषण आग लागली. याठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले आहेत आणि त्यालाच ही आग लागली. या आगीनंतर सर्वत्र धूराचे साम्राज्य होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अग्निशमन दलाचे एक वाहन जळून खाक झाले. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाभोवती मोठ्या प्रमाणात निवासी क्षेत्रे आहेत. या परिसरात अनेक झोपडयादेखील आहेत. त्यामुळे लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

आगीमुळे परिसरात धुराचे जाड थर पसरले आहेत, ज्यामुळे पवन शक्ती नगर, सुरजा नगर, संघर्ष नगर, अबुमिया नगर आणि तुलसी नगर येथील रहिवाशांना श्वास घेणे कठीण झाले आहे. शेजारच्या वस्त्यांमध्ये या आगीमुळे दहशत पसरली आहे. आगीची माहिती मिळताच, लकडगंज, वाठोडा, कळमना, सक्करधारा, त्रिमूर्ती नगर, सिव्हिल लाईन्स आणि सुगत नगर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे नेमके कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाढलेल्या तापमानामुळे आणि कचऱ्यातील ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग मोठी झाल्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी कचरा साठून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी आणि ज्वलनशील वायू तयार होतात. आज तापमानाचा पारा चांगलाच चढला असताना वायू त्याच्या संपर्कात आल्यानेही ही आग लागली असावी, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीच्या भीतीमुळे लोक परिसरातील लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाने नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आग लवकर आटोक्यात न आल्यास जवळच्या लोकवस्तींना धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीच्या ज्वाला आणि धुरांचे लोट पारडी, भंडारा, उमरेड रोडवरुन स्पष्टपणे दिसून येत असल्याने या आगीची भिषणता कडून येते.