लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये शुक्रवार ५ मे रोजी बुद्ब पौर्णिमेला चंद्र तथा चांदण्याच्या प्रकाश पाणवठ्यावर प्राणी गणना होते आहे. या प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरुवारी सायंकाळी ताडोबा प्रकल्पात पत्नी अंजली व मित्रांसोबत दाखल झाला आहे.

सचिन तेंडुलकर यांचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर विशेष प्रेम आहे. काही महिन्यांपूर्वीच सचिन ताडोबा प्रकल्पात पत्नी अंजली सोबत येऊन गेला होता. तेव्हा सचिनला ताडोबातील वाघांनी हमखास दर्शन दिले होते. त्या वेळी सचिनने ज्या रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला होता तिथे व कोलारा प्रवेश गेट येथील व्हीजिटर बुक मध्ये ताडोबा प्रकल्पाच्या आदरातिथ्य बद्दल भरभरून कौतुक केले होते. त्याच वेळी सचिनने लवकरच पुन्हा ताडोबा भेटीला येणार असल्याचे पर्यटक वहीत नोंद केली होती. आता सचिन थेट प्राणी गणना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला आहे. चांदण्या रात्रीच्या प्रकाश पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची मचान वर बसून ही गणना केली जाते. सचिनचे गुरुवारी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर सचिन थेट ताडोबाच्या दिशेनं निघाला.

आणखी वाचा-वाघांच्या अधिवासाने समृद्ध ‘अंबाबरवा’ मध्ये आज प्राणिगणना, वन्य विभागाची जय्यत तयारी

सायंकाळच्या सुमारास सचिन तेंडुलकर पत्नी अंजली, कुटुंब तथा मित्रानसोबत चिमूर भागातील कोलारा गेटने ताडोबात प्रवेश केला. सचिन हा ताडोबात नियमित भेटीसाठी आलेला आहे, अशी माहिती ताडोबा प्रकल्पाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली. प्राणी गणना कार्यक्रमात सहभागी होणार काय याबाबत अधिक माहिती दिली नाही. त्यामुळे उद्या पावसाने विश्रांती घेतली तर सचिन चांदण्या रात्री प्राणी गणना कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Master blaster sachin tendulkar reached at tadoba along with his wife anjali and friends rsj 74 mrj
Show comments