लोकसत्ता टीम
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंतरराज्य टोळीने क्रिकेट व इतर खेळावर ऑनलाइन सट्टा लावण्याचे केंद्र तयार केले होते. अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने छापा टाकून तब्बल ३३ आरोपींना रंगेहात जेरबंद केले. या प्रकरणात मुख्य सूत्रधाराच्या मागावर असलेल्या पोलिसांनी बंगरुळूवरून श्रीलंकेला पळून जाण्याच्या नादात असलेल्या आरोपीला अटक केली. ‘एलओसी’ (लुक आऊट सरक्युलर) द्वारे अटकेची अकोला ही पहिली कारवाई ठरली आहे. ऑनलाइन सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
जिल्ह्यातील कातखेड शिवारात रवींद्र पांडे यांच्या शेतातील तीन मजली इमारतीमध्ये अवैधरित्या विनापरवाना पैशांचे ऑनलाइन खेळ खेळले जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना मिळाली. १८ फेब्रुवारीला पोलीस अधिकारी व पथकाने सुनियोजित छापा टाकला. यावेळी ३३ आरोपी आढळून आले. संकेतस्थळ व ॲपचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कसिनोगेम, ऑनलाईन गेम आदीचा सट्टा आरोपी चालवत होते. व्हॉट्सअप, टेलिग्रामसारख्या समाज माध्यमांच्या समुहावरून त्याची जाहिरात करून ग्राहक मिळवले जात होते. ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे घेऊन त्यांची आयडी तयार केली जात होती. त्यांच्या आयडीवर सट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत असल्याचे आढळून आले.
मालक रवींद्र पांडे याने सट्टा चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांनी फरार आरोपी महेश डिक्कर रा. लोहारी ता. अकोट याच्या माध्यमातून आरोपींची टोळी जमवली होती. तपासादरम्यान, आरोपी महेश डिक्कर प्रशिक्षण घेण्यासाठी दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही फरार आरोपींच्या पासपोर्ट माहिती करून ‘एलओसी’ (लुक आऊट सरक्युलर) उघडण्यात आली होती. आरोपी महेश डिक्कर हा नागपुर, चैन्नई, हैदराबाद, बंगरुळू येथून अनेक वेळा श्रीलंका व दुबई येथे गेल्याचे समोर आले. महेश डिक्कर हा बंगरुळू आंतराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने श्रीलंका येथे पळून जाण्याच्या बेतात असतांना विमातळ प्रशासनाकडे ‘एलओसी’ प्राप्त असल्याने आरोपीला अडवून ठेवले. अकोला स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती दिल्यावर पोलीस पथकाने तत्काळ विमानाने बंगळुरू गाठून आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीला १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.