वाशीम : रिसोड पंचायत समितीमधील साहित्य खरेदी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला. यामधे दोषी आढळून आल्याने तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी दीपकसिंह साळुंके, कनिष्ठ लेखा अधिकारी कैलास नारायण राजगुरू व कनिष्ठ सहाय्यक विशाल रामेश्वर सदार यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिसोड पंचायत समिती कार्यालयात साहित्य खरेदी, वाहन इंधन, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक व इतर कार्यालयीन खरेदीसाठी १३ लाख रुपयांचा निधी मिळाला होता.
हेही वाचा >>> शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; संशयाची सुई शेतकऱ्यावर…
प्रत्यक्षात साहित्य खरेदी न करता खोटी बिले दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी याप्रकरणी चौकशीसाठी जिल्हा परिषद स्तरावरून चौकशी समिती गठित केली होती. या समितीने संबंधित घोटाळ्याची चौकशी करून अंतिम अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याकडे पाठवला होता. या अहवालावरून तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी दीपकसिंह साळुंके, कनिष्ठ लेखा अधिकारी कैलास नारायण राजगुरू व कनिष्ठ सहाय्यक विशाल रामेश्वर सदार हे प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्याचे समोर आले असल्याने तिघांनाही निलंबित करण्यात आले. दरम्यान, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.