नागपूर : अवकाळी पावसाचे सावट दूर होताच पुन्हा एकदा राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ झाली असून अकोला या शहरात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. राज्यातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. विदर्भातील इतर बहुतांश शहरांमध्ये देखील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवण्यात आले.
उन्हाळ्याची सुरुवात यावेळी दरवर्षीपेक्षा लवकर झाली. होळीनंतर साधारणपणे तापमान वाढण्यास सुरुवात होते. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हातच तापमानाने चाळीशी गाठली. मार्च महिना संपण्याआधीच कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. तर हवामान खात्याने दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला. दरवर्षी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होते. यावर्षी देखील मार्च संपण्याआधीच विदर्भात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात तापमानात तब्बल आठ ते दहा अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र, अवकाळीचे सावट दूर होताच तेवढ्याच वेगाने तापमानात वाढ झाली.
सर्वाधिक तापमानाची नोंद
रविवारी विदर्भातील अकोला शहरात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. ब्रम्हपुरी येथे ४२.९ अंश सेल्सिअस तर अमरावती व चंद्रपूर येथे ४२.६ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद झाली. यवतमाळ येथे ४२.४ अंश सेल्सिअस तर उपराजधानी नागपूर येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. वर्धा येथे ४१.१ अंश तर राज्यातील सोलापूर शहरात ४१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. राज्यातील उर्वरित शहरांमध्ये देखील तापमानाने चाळीशी गाठली आहे.
पुढील पाच दिवस…
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणपट्ट्यात प्रचंड तापमानाची नोंद होत असून उष्ण व दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील पाच दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता आहे.