इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) एकीकडे नवनवीन विभाग वाढल्यावरही परिचारिकांची पदे वाढवली जात नाहीत. दुसरीकडे त्वचारोग विभागाचा मेयोत एकही वार्ड नसताना प्रशासनाकडून येथे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) निरीक्षणादरम्यान वार्ड दाखवण्याची बनवाबनवीचा मंगळवारी प्रयत्न केला. त्यावर संतप्त परिचारिकांनी आयोगापुढेच अचानक कामबंद केल्याने ही बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णसेवाही प्रभावित झाली.
हेही वाचा >>>नागपूर : हवालाचे १.९७ कोटी रुपये कारची काच फोडून चोरून नेले
मेयो प्रशासनाकडून त्वचारोग विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम मिळवण्यासाठी एनएमसीकडे अर्ज केला होता. त्यानुसार एनएमसीची चमू मंगळवारी मेयोत येणार असल्याची कुजबूज मेयो प्रशासनाला कळली. त्यावरून अधिकाऱ्यांनी मेयोत एकही त्वचारोग विभागाचा वार्ड नसताना सोमवारी रात्री ‘सर्जिकल काॅम्प्लेक्स’मध्ये दुसऱ्या विभागाचा वार्ड त्वचारोग विभागाचा दर्शवण्यासाठी बनवाबनवीचा खेळ सुरू केला. त्यासाठी या वार्डात बोर्ड लावला गेला. ही माहिती परिचारिकांना कळताच त्या संतापल्या व त्यांनी मंगळवारी निरीक्षणादरम्यान अचानक कामबंद केले.
आंदोलनाच्या निमित्ताने परिचारिकांनी मेयो परिसरात गोळा होऊन शासनासह मेयो प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. एनएमसीच्या निरीक्षणादरम्यानच हा प्रकार घडल्याने येथील त्वचारोग विभागाला आता मान्यता मिळणार काय? याकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. कधीकाळी शासनाच्या लोकलेखा समितीने ‘मेयो नव्हे कत्तलखाना’ अशापद्धतीने मेयोवर ताशेरे ओढले होते. मेयोतील पदवी व पदव्युत्तरच्या जागांवर नेहमीच टांगती तलवार राहत होती. त्यापैकी बऱ्याच त्रुटी दूर झाल्याने मेयो प्रशासनाला दिलासा मिळाला होता. हा प्रकार ताजा असतानाच पुन्हा पदव्युत्तर जागेसाठीचा खोटारडेपणा पुढे आल्याने मेयोसह वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा >>>नागपूर : घर देता का घर? मिहान प्रकल्पग्रस्त, शेतकरी अद्यापही वाऱ्यावर
औषधशास्त्राचा वार्ड रातोरात झाला त्वचारोगचा वार्ड
पदव्युत्तर विभाग सुरू करण्यासाठी एनएमसीचे मेयोत निरीक्षण होते. त्याची माहिती असतानाही मेयो प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी केली नाही. उलट रात्रभरात मेयोत दोन वॉर्ड तयार केले गेले. मेयोत ९०० खाटा आहेत. त्या तुलनेत येथे केवळ २८१ परिचारिका कार्यरत आहेत. पदभरती सुरू होत नाही. मात्र, दरदिवसाला नवीन विभाग सुरू करण्यात येतो. यामुळे परिचारिकांमध्ये अंसंतोष पसरल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
त्वचारोग विभागात सहसा रुग्णांना दाखल व्हावे लागत नाही. परंतु, निकषानुसार येथे स्वतंत्र वार्ड असायलाच हवा. तूर्तास मेयोत खाटांची अडचण असल्याने ‘सर्जिकल काॅम्प्लेक्स’मध्ये स्वतंत्र वार्ड त्वचारोग विभागासाठी केला. यावेळी परिचारिकांची समजूत काढत शासनाकडे परिचारिकांची पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कळवले. त्यानंतरही आंदोलन करणे योग्य नाही. शेवटी येथे त्वचारोग विभागाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यास त्याचा एकीकडे रुग्णांना लाभ होण्यासह विद्यार्थ्यांना अद्ययावत पदव्युत्तर शिक्षण घेता येईल.- डॉ. संजय बिजवे, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय, नागपूर.