खुल्या गटाला संधी मिळाल्याने भाजपमधील इच्छुकांची मोर्चेबांधणी

नागपूरच्या महापौरपदासाठी बुधवारी काढण्यात आलेल्या सोडतीत हे पद खुल्या गटासाठी सुटल्याने या प्रवर्गातील भाजपमधील  नगरसेवकांना महापौरपदाची संधी चालून आली आहे. पक्ष कोणाच्या गळ्यात ही माळ घालणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय संदीप जोशी आणि संजय बंगाले यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची नावे या पदासाठी दावेदार म्हणून पुढे आली आहेत.

पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित होते. मात्र तेव्हा लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून या पदावर बहुजन समाजातील नंदा जिचकार यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षात थोडी नाराजी होती. यावेळी पुन्हा खुल्या गटासाठी हे पद आरक्षित असल्याने याच गटातील नगरसेवकाला संधी मिळावी, असा आग्रह भाजपमध्ये आहे. या पदासाठी  महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, दयाशंकर तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये द.पश्चिम नागपूर मतदारसंघात जोशी यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती. संजय बंगाले हे सुद्धा  फडणवीस यांचे निकटवर्तीय व संघाशी जुळलेले नगरसेवक आहेत. दयाशंकर तिवारी यांच्या निमित्ताने भाजपला उत्तर भारतीयांना खूश करण्याची संधी आहे. विधानसभा निवडणुकीत एक जागा या समाजासाठी सोडावी, अशी मागणी करण्यात तिवारी अग्रभागी होते. राज्यात पुढच्या काळात पुन्हा भाजपची सत्ता आली नाही तर आर्थिकदृष्टय़ा संकटात असलेल्या महापालिकेला कुशलतेने सांभाळण्यासाठी अनुभवी सदस्याची गरज भासणार आहे. याचाही यावेळी विचार भाजपमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हेच महापौरांचे नाव अंतिम करणार आहेत.

विद्यमान महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळ २१ नोव्हेंबपर्यंत आहे. त्यापूर्वी नव्या महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने  विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यांच्या परवानगीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. १६ नोव्हेंबरला महापौरपदासाठी नामांकनपत्र भरले जाण्याची शक्यता आहे. १५१ सदस्यीय महापालिकेत भाजपकडे ११२ सदस्यांचे बहुमत आहे.

उपमहापौर कोण?

महापौरांसोबतच उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.  लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अडीच वर्षांसाठी दीपराज पार्डीकर यांची या पदावर निवड करण्यात आली होती. आता उर्वरित अडीच वर्षांसाठी या पदावर कोणाची वर्णी लागेल, याचीही उत्सुकता आहे. या पदासाठी धम्मपाल मेश्राम व  आभा पांडे यांच्या नावाची चर्चा आहे.

Story img Loader