अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पंचतारांकित आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाविषयी शासनापर्यंत अनेक तक्रारी गेल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत (एमसीएईआर) चौकशी सुरू असून काही माहिती मागवली जात आहे.
परिसंवाद २०१४च्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्यात सततच्या अवर्षणामुळे शेती व्यवसायात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती तसेच विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असताना आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद घेऊनही त्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निष्पन्न झाले नाही. उलट लाखो रुपयांचा खर्च झाला. यासंदर्भात विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गोपी ठाकरे आणि नितीन हिवसे यांनी ‘एमसीएईआर’कडे तक्रारी केल्या. तसेच आमदार रणधीर सावकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर सादर केलेले उत्तर त्रोटक आणि अपूर्ण माहिती देणारे होते. त्यात परिसंवाद आयोजनासाठी लागणारा निधी खासगी कृषी शाळा, महाविद्यालये यांच्याकडून गोळा केल्याचे समर्थन केले होते. एवढे मोठे पंचतारांकित आयोजन करताना विद्यापीठाने ‘एमसीएईआर’ची परवानगी घेतली नव्हती.
तरीही डिसेंबर-२०१४च्या पहिला परिसंवाद फार्मर्स डायलॉग इंटरनॅशनल, अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख अ‍ॅग्री फाऊंडेशन, पाचगणीचे इनिशेएटिव्ह ऑफ चेंज आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. त्यांच्याशी झालेला करारनामा आणि बैठकीच्या इतिवृत्ताविषयी माहिती तसेच या परिसंवादासाठी आवश्यक असलेली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, राज्य शासन किंवा भारतीय कृषी संशोधन परिषद यांची परवानगी घेतली होती का? आयोजनावर करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील, शास्त्रज्ञांचे प्रवास खर्च व भत्त्यांच्या प्रतिपूर्तीबाबतचा तपशीलही डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे मागवण्यात आला आहे. सध्या शेती व्यवसायातील दुरवस्था व ग्रामीण भागातील वस्तुस्थिती लक्षात घेता, परदेशस्थ पाहुण्यांचे संमेलन भरवून तसेच स्वागतावर मोठय़ा प्रमाणावर खर्च होणे हा शासकीय निधीचा दुरुपयोग असल्याचे नमूद करीत फेब्रुवारी-२०१६ मधील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाला ‘एमसीएईआर’ने परवानगी नाकारल्याची ताजी घडामोड आहे.
अकोला कृषी विद्यापीठाच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागालाही प्राप्त झाल्याने त्याची चौकशी ‘एमसीएईआर’मार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यात भाग घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय शेतकरी आणि शास्त्रज्ञांची नावे, पारपत्र क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि इमेल मागवण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातून भाग घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे, परिसंवादात निधी गोळा केलेल्या देणगीदारांची नावे, पत्ते व प्रत्येकी घेतलेल्या वर्गणी, निधीच्या रकमेचा तपशीलही मागवण्यात आला आहे.
यासंदर्भात राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले ‘एमसीएईआर’चे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी डिसेंबर-२०१४ मधील परिसंवादानिमित्त काही अनियमितता दिसून आल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे माहिती मागितली जात असून चौकशीही करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा