या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • दिलीप ग्वालबंशीसह पाच जणांचा समावेश
  • कारवाई सुरूच राहणार, एसआयटीचे सुतोवाच

भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबंशीसह पाच जणांविरुद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोक्का अंतर्गत कारवाई केली असून त्यांना किमान आता १८० दिवस कारागृहाच्या कोठडीत काढावे लागतील. याशिवाय ईश्वर बाबुराव सुप्रेतकर (४६) रा. जुनी झिंगाबाई टाकळी, अ‍ॅन्थोनी ऊर्फ जितू जॉन स्वामी (४७) रा. श्रीकृष्णधाम झोपडपट्टी, प्रेम चुन्नीलाल यादव ग्वालबंशी (४३) रा. मकरधोकडा आणि पप्पू ऊर्फ राहुल रामाश्री यादव (४८) रा. शिवकृष्णधाम झोपडपट्टी अशी मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भूमाफियांच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यात ती सुरूच राहणार असल्याचा, असा इशारा एसआयटीचे प्रमुख उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.

मौजा झिंगाबाई टाकळी येथील खसरा क्रमांक ११०, १११/१ येथे तवक्कल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे भूखंड आहेत. त्या ठिकाणी सैफल्ला सय्यद कलीमुल्ला सय्यद यांचेही तेथे भूखंड असून त्या ठिकाणी त्यांना बांधकाम करायचे होते. त्यासाठी ते आपल्या तीन ते चार मित्रांसह तेथे गेले असता दिलीप ग्वालबंशी आणि इतर आरोपींनी त्यांना अडविले. त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली आणि भूखंडावर परत न येण्यास सांगितले. भूखंड परत हवे असल्यास प्रत्येकाने ३ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर सय्यद यांनी एसआयटीकडे तक्रार केली. एसआयटीने प्रकरणाचा तपास केला आणि कोराडी पोलीस ठाण्यात दंगल घडविणे, मारहाण करणे आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दिलीपला अटक करण्यात आली, तर इतर चारही आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासून पोलिसांनी मोक्का लावला. आता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे करतील.ू

दिलीपवर १३ तर इतरांवरही अनेक गुन्हे

दिलीप ग्वालबंशीविरुद्ध या गुन्ह्य़ाच्या पूर्वीचे १२ आणि हा असे तेरा गुन्हे दाखल असून त्याला टोळीचा प्रमुख दाखविण्यात आले आहे. या गुन्ह्य़ानंतर दिलीपविरुद्ध पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले. आता एकूण १७ गुन्हे झाले आहेत. त्यानंतर ईश्वर सुप्रेतकरविरुद्ध ५ गुन्हे, अ‍ॅन्थोनी ऊर्फ जितूविरुद्ध ८ गुन्हे, प्रेमविरुद्ध ३ गुन्हे आणि पप्पूविरुद्ध १ गुन्हा अशी त्यांची पाश्र्वभूमी आहे.

आतापर्यंत ४१२ लोकांना भूखंड परत

भूमाफिया दिलीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी हजारो लोकांची जमीन बळकावली आहे. त्यापैकी केजीएन सोसायटीतील ६०, वैभवानंदमधील १०, तवक्कल सोसायटीतील १००, नर्मदा हाऊसिंग सोसायटीतील ७० आदी ४१२ लोकांनी आपल्या भूखंडांचा ताबा घेतला आहे. एसआयटीत भूखंड माफियांचा तपास सुरू असल्याने आता लोकांकडून भूखंड हिसकवायला कुणी धजावत नसल्याने लोकांची हिंमत वाढली असून ते आपल्या भूखंडांचा ताबा घेऊन बांधकाम करीत आहेत.

एसआयटीकडे  २३०० तक्रारी

एसआयटीकडे आतापर्यंत भूखंड बळकावणाऱ्यांच्या विरोधात २ हजार ३०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ५३२ अर्ज असून २६० तक्रारी अर्ज ग्वालबंशी कुटुंबीयांविरोधात आहेत. २७२ अर्ज इतरांच्या विरोधात आहेत. सोसायटय़ांच्या ५४ तक्रारी आहेत, वैयक्तिक १५२ अर्ज आहेत. सगळया तक्रारींची संख्या जवळपास २ हजार ३०० च्या वर आहे, अशी माहिती संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcoca act nagpur land mafia
Show comments