नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आरोप करीत न्यायालयात याचिका करणाऱ्या ॲड. सतीश उके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी सतीश उके आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासुप्रच्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नव्याने एक गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. ॲड. उके हे २०२२ मध्ये आर्थिक गुन्ह्यात ईडीने अटक केल्यापासून मुंबईच्या कारागृहात बंद आहेत.

हेही वाचा – ‘चंद्रभागे’च्या काठावर सापडली, कष्टाने बारावी झाली, नोकरीही लागली अन पुन्हा मृत्यूच्या..!

नागपूर सुधार प्रन्यासचे विभागीय अभियंता पंकज पाटील यांनी ॲड. सतीश उके यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारावर नागपूर पोलिसांनी उके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींवर ‘मोक्का’ लावला. उके यांच्या कुटुंबातील सदस्य प्रदीप महादेव उके (भाऊ), त्याची पत्नी माधवी प्रदीप उके, शेखर महादेव उके (भाऊ), मनोज महादेव उके (भाऊ), सुभाष मणिलाल बघेल (श्रीरंग हाउसिंग को-ऑपरेटिव सोसायटीचे अध्यक्ष) आणि चंद्रशेखर नामदेवराव मते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, सतीश उके यांनी कुटुंबातील चार सदस्य आणि चंद्रशेखर मते सुभाष बघेल यांच्याशी संगनमत करून १९९० मध्ये विठ्ठल धावडे यांच्या मालकीच्या भूखंडाचे बनावट दस्तऐवज बनविले होते. ईडीने एप्रिल २०२२ मध्ये उके यांच्या घरी छापा घालून दोघा भावांना अटक केली होती. त्यावेळी ईडीच्या हाती विशेष काही लागले नव्हते.

हेही वाचा – लोकजागर: स्वप्नांचे ‘शोषण’!

राजकीय संघर्षामुळे चर्चेत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे दाखल असल्याची बाब लपवल्याचा आरोप आहे. हीच बाब हेरून ॲड. उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी ॲड. उके यांची जवळिक आहे. ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल प्रकरणातसुद्धा ॲड. उके यांनी न्यायालयात पटोले यांची बाजू मांडली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcoca against satish uke and family who filed petition against fadnavis adk 83 ssb
Show comments