नागपूर : उपराजधानीतील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निम्मे स्थायी डॉक्टर उन्हाळी सुट्ट्यांवर गेले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. डॉक्टरांच्या सुट्ट्यांमुळे काही प्रमाणात वार्डातील डॉक्टर कमी झाल्याने रुग्णांना मन:स्ताप होत आहे.
मेडिकलमध्ये नुकतेच एका व्यक्तीचा क्ष-किरणशास्त्र विभागात मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येवर बोट ठेवले. सध्या मेडिकल आणि मेयोमधील सुमारे दोनशेवर डॉक्टर उन्हाळी रजेवर आहेत. मेडिकलमध्ये दिवसाला तीन हजार तर मेयो रुग्णालयात दोन हजार रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. परंतु, रुग्णांना तपासण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरच उपस्थित नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा – ‘पाल’देखील सुंदर असू शकते; भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञांसह चिमुकल्या संशोधकांची कामगिरी
मेडिकल, मेयो या शैक्षणिक संस्था आहेत. यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा प्रघात येथे आहे. रुग्णसेवा शंभर टक्के प्रभावित होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० टक्के डॉक्टर रजेवर असतात. ते परत आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ५० टक्के डॉक्टर उन्हाळी रजेचा आनंद घेतात. यावर्षी पहिल्या टप्प्यात २१ एप्रिल ते ११ मे या काळात पन्नास टक्के डॉक्टरांनी उन्हाळी रजा घेतल्या. उर्वरित ५० टक्के डॉक्टर १२ मे पासून ३० मे पर्यंत उन्हाळी सुट्टीचा आनंद घेणार आहेत.