नागपूर : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाचा नागरिकांमध्ये संताप असतानाच नागपुरातील मेडिकल-मेयो या रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. त्याची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मेडिकल प्रशासनाला या मृत्यूंची माहिती मागितली आहे. तर ३ ऑक्टोबरलाही दिवसभरात मेडिकल-मेयोत १६ मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.
मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सरासरी मृत्यू बघितल्यास दोन्ही रुग्णालयांत १७ ते १९ रुग्णांचे दैनिक मृत्यू नोंदवले जातात. त्यात मेडिकलमधील १२ ते १३ रुग्ण आणि मेयोतील ३ ते ६ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २ ऑक्टोबरला मेडिकलमध्ये १६ तर मेयोत ९ असे एकूण २५ मृत्यू झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयात भ्रमणध्वनी करून तातडीने या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. त्यातच ३ ऑक्टोबरलाही मेडिकल-मेयो या दोन्ही रुग्णालयांत १६ मृत्यू झाले. त्यात मेडिकलमधील १२ आणि मेयोतील ४ मृत्यूंचा समावेश आहे. दरम्यान, ३ ऑक्टोबरचे मृत्यू मात्र नेहमीच्या सरासरी मृत्यू एवढे असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
हेही वाचा – वाह रे पठ्ठा! अजयची भरारी…, वडील गुरे राखतात तर आई करते मजुरी…
खासगीतून शेवटच्या क्षणी रुग्ण शासकीय रुग्णालयात
मेडिकल आणि मेयो रुग्णालय प्रशासनाने १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान दोन्ही रुग्णालयांत शेवटच्या खूपच वाईट अवस्थेत खासगी रुग्णालयातून कोणतीही सूचना न देता अचानक हलवल्या जाणाऱ्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यात त्यांना मेडिकलमध्ये १ ऑक्टोबरला जीवनरक्षण प्रणालीवरील ८ रुग्ण, २ ऑक्टोबरला १५ रुग्ण, ३ ऑक्टोबरला ११ रुग्ण हलवल्याचे निदर्शनात आले. या रुग्णांना अतिदक्षता विभागात हलवल्यावर त्यांच्याच मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे पुढे आले. मेयोतही स्थिती सारखीच आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
मध्य भारताचे आरोग्य केंद्र असलेल्या मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण दाखल होतात. या रुग्णालयांवर सर्वांचा विश्वास असून गरिबांसाठी हे दोन्ही हॉस्पिटल अद्ययावत असणे आवश्यक आहे. या रुग्णालयांतील मृत्यू प्रकरणावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दोन्ही अधिष्ठात्यांशी संपर्क साधून येथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
मार्ड आणि परिचारिका संघटनांचे म्हणणे काय?
मेडिकल-मेयोतील निवासी डॉक्टरांची मार्ड संघटनेच्या म्हणण्यानुसार दोन्ही रुग्णालयात खासगी रुग्णालयातून खूपच खालावलेल्या अवस्थेत पाठवले जाणारे अत्यवस्थ रुग्ण येथे रुग्णशय्या नसल्याचे सांगत नाकारता येत नाही. त्यातच येथे एम्समधूनही अत्यवस्थ रुग्ण हलवले जातात. येथे दगावणाऱ्या अनेक रुग्णांना खासगी रुग्णालये तो रुग्ण वाचणे शक्य नसल्याने दाखलही करून घेत नाही. त्यामुळे येथे मृत्यू अधिक आहे. त्यातच मेडिकल-मेयोत रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर-परिचारिका कमी आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांचा अतिरिक्त भार दुसरीकडे हाफकीनमुळे औषधांसह इतर साधनांच्या तुटवड्याचाही परिणाम होतो. परिचारिका संघटनेचे झुल्फी अली यांनी दोन्ही रुग्णालयांतील पायाभूत सुविधा वाढवण्यासह डॉक्टर-परिचारिकासह इतरही कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.
हेही वाचा – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणतात, आदिवासीमध्ये नवीन जातीचा समावेश नाही
मेडिकलमध्ये खूपच खालावलेल्या अवस्थेत खासगीतून कोणतीही सूचना न देता अचानक रुग्ण हलवले जातात. या सगळ्यांवर आम्ही सर्वोत्तम उपचार करून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. २ ऑक्टोबरलाही खासगीतून खूपच प्रकृती खालावलेलेच १५ रुग्ण दगावले आहे. मेडिकलमध्ये पर्याप्त औषधी उपलब्ध आहे. – डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल रुग्णालय, नागपूर.
मेडिकल-मेयो रुग्णालयातील मृत्यूची स्थिती
(टिप : मेडिकल, मेयोच्या रकान्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या)
…………………………………………….
दिनांक – मेडिकल – मेयो – एकूण
…………………………………………….
१ ऑक्टो. – १५ – ०३ – १८
२ ऑक्टो. – १६ – ०९ – २५
३ ऑक्टो. – १२ – ०४ – १६
………………………………………………..