यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘नीट’ प्रवेश परीक्षेदरम्यान यवतमाळ येथील एका परीक्षा केंद्रावर दोन डमी उमेदवारांनी परीक्षा दिली. या प्रकरणी राजस्थानातील दोघे जण सध्या अटकेत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. यात प्रमुख दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर असून, अन्य आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जितेंद्र रामगोपाल गाट (२२, रा. पुलग, बिकानेर, राजस्थान), महावीर सिखरचंद्र अजाडीवाल (रा. गंगाशहर चौक, बिकानेर), अशी अटकेत असलेल्या डमी उमेदवारांची नावे आहेत. रविवारी धामणगाव मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘नीट’ परीक्षा पार पडली. यावेळी दोन डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली. आकाश चंद्रकांत पाटील (२१, रा. कोपरी, जि. पालघर) याच्या जागेवर जितेंद्र गाट (चौधरी), तर यश निळोबा मुंडे (रा. खानापूर, जि. परभणी) याच्या जागेवर महावीर अजाडीवाल यांनी परीक्षा देवून शासनाची फसवणूक केली. दोघांकडून बनावट प्रवेश पत्रासह बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले. नीट परीक्षेला डमी उमेदवार बसवून पैसे कमाविणाऱ्यांची एक मोठी साखळी असल्याचा पोलीस प्रशासनाला संशय आहे. दिल्ली, आसाम आणि राजस्थानपर्यंत कनेक्शन जुळू शकतात. त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा खोलवर तपास करून हुशार विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

‘नीट’ परीक्षेदरम्यान दोन डमी उमेदवारांना अटक करण्यात आली होती. नियमित अभ्यास करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यात दारव्हा एसडीओंसह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यात येणार आहे.

– डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ.

Story img Loader