लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी दरवर्षी आपल्या अनेक नियमांमध्ये बदल करत असते.
दोन वर्षांपूर्वी झालेला अभ्यासक्रम बदल आपल्याला माहिती असेल. यानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण ९ पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५ गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५ असतील.
आणखी वाचा-एका लग्नाची गोष्ट : नवरदेव जर्मनीचा अन् नवरी गोंदियाची; विदेशी पाहुणे वरातीत थिरकले अन्…
सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याला विरोध झाल्याने आयोगाने हा निर्णय मागे घेतला. परंतु आता पुन्हा नवा बदल करण्यात आला आहे. यानुसार आता एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती आधीच वैद्यकीय तपासणीला एमपीएससी उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. २०२३ च्या जाहिरातीच्या मुख्य परिक्षेपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तर यानिर्णयानुसार, जानेवारी २०२४ मध्ये या वैद्यकीय तपासणीला सुरूवात होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता.
दरम्यान, हा निर्णय एमपीएससी मुख्य परीक्षा २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.