नागपूर : मेडिकलला उपचार घेणारे बहुतांश रुग्ण गरीब असतात. दिवाळीत या रुग्णांचे तोंड गोड करून त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मेडिकल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दिवाळीनिमित्त १२ नोव्हेंबरला या रुग्णांना जेवणात वेज पुलाव, पराठा, दोन भाज्या, मूग डाळ हलवा दिला जाणार आहे.
मेडिकलमध्ये बीपीएल संवर्गातील रुग्णांवर नि:शुल्क तर इतर रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार होतात. या रुग्णांसाठी प्रशासन मेडिकलच्या स्वयंपाकघरात नाश्ता-जेवणाची सोय करते. येथील नाश्ता-जेवण मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालय, ट्रामा केअर सेंटरमधील रुग्णांनाही दिले जाते.
मेडिकलच्या जेवणात रोज वरण, भात, एक भाजी, पोळी हे पदार्थ असतात. त्यात कमी तेल, तिखट, मीठ असते. या रुग्णांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी १२ नोव्हेंबरला विशेष थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रुग्णांना वेज पुलाव, पराठा, दोन प्रकारच्या भाज्या, मूग डाळ हलवा, पकोडा हे पदार्थ दिले जाणार आहेत.
आतषबाजी दरम्यान वार्डातील खिडक्या बंद
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिवाळीनिमित्त घ्यायच्या विशिष्ट काळजीबाबत प्रथमच दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार फटाके फुटत असताना मेडिकलच्या खिडक्या बंद राहतील. आगीसह इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी वार्डातील पडदे तपासले जातील. वसतिगृह परिसरात फटाके फुटू नये म्हणून काळजी घेतली जाईल. सोबत रुग्णालय परिसरात कुणीही दिवे लावू नये व फटाके फोडू नये म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘समृद्धी’वर भरधाव कारचा टायर फुटला, अपघातात पाच प्रवासी जखमी
“मेडिकलला बहुतांश गरीब रुग्ण उपचाराला येतात. या रुग्णांचे दिवाळीत तोंड गोड व्हावे म्हणून अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी विशेष थाळी देण्यास मंजुरी दिली. पदार्थ निश्चित करताना रुग्णांना प्रोटिन मिळेल याचीही काळजी घेतली गेली.” – डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.