नागपूर: उपराजधानीतील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनीही मार्डच्या राज्यव्यापी संपात सोमवारी सहभाग घेतला. त्यामुळे दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परंतु या रुग्णालयांकडून आवश्यक काळजी घेतल्याने रुग्णसेवा सुरळीत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान दोन्ही महाविद्यालयांत निवासी डॉक्टरांनी धरणे व निदर्शने केली.
राज्यात केवळ नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) अशी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. येथील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासह विद्यार्थ्यांना अद्यावत वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी शासनाने येथे पदव्यूत्तरच्या जागा मंजूर केल्या आहेत. सध्या मेडिकलला वर्षांचे ५८३ तर मेयोला ३५० च्या जवळपास निवासी डॉक्टर आहेत. त्यापैकी मेडिकलचे ७०, मेयोतील ३५ असे एकूण १०५ निवासी डॉक्टर वगळता इतर संपावर आहेत.
निवासी डॉक्टरांनी आकस्मिक अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शल्यक्रिया विभागातील अत्यवस्थ रुग्णांवा सेवा देण्याचा निर्णय घेतल्याने १० ते १५ टक्के निवासी डॉक्टर सेवेवर असल्याने प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला आहे. परंतु बाह्यरुग्णसेवा व जनरल वार्डात हे डॉक्टर सेवा देत नसल्याने येथील काही वार्डात डॉक्टरच नसल्याचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. तर रुग्णालय प्रशासनाकडून वरिष्ठ डॉक्टरांसह वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विविध वार्डात नियोजन करून सेवा घेण्यात आल्याने तुर्तास रुग्णांना कुठेही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतल्याचा दावा होत आहे. त्यातच मेडिकल आणि मेयोतील निवासी डॉक्टरांनी सोमवारी त्यांच्या महाविद्यालय परिसरात धरणे व निदर्शने करत तातडीने मागण्या मंजूर करण्याची मागणी केली.
मागण्या काय?
– वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १,४३२ जागांची पदनिर्मिती
– शासकीय- महापालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहातील हेळसांड थांबवा
– सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरावी, त्यामुळे निवासी डॉक्टरांवरील ताण कमी होईल
– वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून समान वेतन लागू करावी
– महागाई भत्ता तात्काळ लागू करावा