रिकाम्या बाटल्यांचा खच सापडला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मद्य मैफिली जोरात रंगत असून सोमवारी येथील अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात रिकाम्या बाटल्यांचा खच आढळला. हा खच एका प्लास्टिकच्या कचरापेटीत ठेवल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्यावर हा प्रकार पुढे आला.
औषधांची कमी, रुग्णांची गैरसोय, इतरही वाद-विवादामुळे मेडिकल नेहमीच चर्चेत असते. येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात बऱ्याचदा दारूच्या पाटर्य़ा रंगत असतात. हा प्रकार पुढे आल्यावर अधून- मधून प्रशासनाकडून वसतिगृहांची झडती घेऊन थातूरमातूर कारवाई केली जाते. परंतु अद्यापही या पाटर्य़ा पूर्णपणे थांबवण्यात प्रशासनाला यश आले नाही.
त्यातच सोमवारी अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जमा असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी सगळ्या ब्७ााटल्या गोळा केल्या.
दरम्यान, हे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या बाटल्या वरच्या माळ्यावरील विभागातून फेकण्यात आल्याचे पुढे येत आहे. प्रशासन येथील मद्यपान थांबवण्यासाठी काय उपाय करणार, याकडे लक्ष लागले आहे.