लोकसत्ता टीम
नागपूर : गरीब रुग्णांसाठी आधारस्तंभ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडिकल) करिता रोबोटिक सर्जरी सिस्टिम खरेदी करण्याचा आदेश वादात सापडला आहे. बेंगळुरू येथील इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया कंपनीने या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
रोबोटिक सर्जरी सिस्टिम खरेदीच्या निविदेत इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया, गुरुग्राम येथील सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन व रायपूर येथील बागरी एंटरप्राईज या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामधून सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन कंपनीला ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सिस्टिम खरेदीचा आदेश जारी करण्यात आले. त्यावर इंटुईटिव्ह कंपनीने न्यायालयात याचिका दाखल करत आक्षेप नोंदविला आहे.
आणखी वाचा-अमरावती : धक्कादायक! युवकाने भररस्त्यात स्वत:ला पेटवून घेतले…
मेडिकल अधिष्ठात्यांनी सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन कंपनीला लाभ पोहोचवण्यासाठी अधिकार नसताना निविदेच्या अटी शिथिल केल्या. सुधीर श्रीवास्तावसह बागरी एंटरप्राईजही या निविदेसाठी पात्र नाही. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना अपात्र घोषित करून खरेदी आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती इंटुईटिव्ह कंपनीने याचिकेत केली आहे. याशिवाय कंपनीने स्वतःला खरेदी आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. रोबोटिक्स यंत्र खरेदीसाठी २० कोटी ६२ लाख ४२ हजार ९६२ रुपये मिळाले आहेत. परंतु, विविध कारणांमुळे खरेदी २०१८ पासून रखडली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मेडिकल अधिष्ठाता, सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन व बागरी एंटरप्राईज यांना नोटीस बजावून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.