संचालक डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

जीवनदायी आरोग्य योजनेसह इतर शासकीय योजनांमध्ये बनावट रुग्ण दाखवून जवळपास ४ कोटी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी मेडिट्रिना रुग्णालयाचे संचालक डॉ. समीर नारायणराव पालतेवार यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाचे दुसरे संचालक व भागीदार गणेश रामचंद्र चक्करवार (५८) रा. शुभम रिजेन्सी, कॅनल रोड यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसात दाखल तक्रारीनुसार, डॉ. पालतेवार हा रामदासपेठ येथील लेक प्रेस्टिज अपार्टमेंट, फार्मलँडच्या ५०२ फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहतो. फिर्यादी चक्करवार हे व्यवसायाने आयकर सल्लागार आहेत. डिसेंबर २००६ मध्ये चक्करवार व डॉ. पालतेवार यांनी संयुक्तपणे व्हीआरजी हेल्थ केअर प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. या कंपनीने रामदासपेठेत जागा खरेदी केली व मेडिट्रिना इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स हे रुग्णालय सुरू केले. १९ फेब्रुवारी २०१२ पासून हे रुग्णालय सुरू आहे. यादरम्यान राजीव गांधी जीवनदायी योजना (आताचे महात्मा फुले जनआरोग्य योजना), वेकोलि, केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजना, मध्यप्रदेश दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी आरोग्य योजना अशा विविध शासकीय योजनांच्या  यादीमध्ये रुग्णालयाचे नाव आले. डॉ. पालतेवार हा डॉक्टर असल्याने इतर भागीदारांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. यादरम्यान डॉ. पालतेवार याने सरकारी योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या गरजू लोकांकडूनही पैसे घेतले, तर काही बनावट रुग्ण दाखवून सरकारी योजनांमधून पैसे लाटले. त्यामुळे ऑक्टोबर २०१५ मध्ये रुग्णालयाला जीवनदायी योजनेच्या यादीतून निलंबित करण्यात आले. मे २०१६ मध्ये रुग्णालय पुन्हा यादीत आले. २८ फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा सरकारने रुग्णालयाला निलंबित केले. डॉ. पालतेवारच्या या प्रतापांमुळे वारंवार रुग्णालयाला सरकारी योजनेच्या यादीतून काढण्यात येत असल्याने एक दिवस रुग्णालयाला भेट देऊन हिशेब तपासण्यात आला. त्यावेळी डॉ. पातलेवार याने परस्पर अनेक रुग्णांना पैसे परत करण्याच्या नावाखाली व इतर वैयक्तिक शुल्क म्हणून जवळपास ४ कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांनी विविध शासकीय योजनांमध्ये बनावट रुग्ण दाखवून उकळलेल्या रुग्णांची यादीच एकाने टपालाने पाठवली. त्यातून डॉ. पालतेवारने १ कोटी ४० लाख रुपये उकळल्याचे स्पष्ट होते. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर चक्करवार यांनी पोलिसांत तक्रार दिली. सीताबर्डी पोलिसांनी तपास करून पालतेवारविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुत्तेमवार बंधूही होते भागीदार

व्हीआरजी कंपनीच्या स्थापनेवेळी डॉ. पालतेवार, चक्करवार आणि गीतेश विलास मुत्तेमवार हे तिघे भागीदार होते. त्यावेळी चक्करवार यांची ५० टक्के, पालतेवार व मुत्तेमवारांची प्रत्येकी २५ टक्के भागीदारी होती. २ एप्रिल २०१२ मध्ये विशाल मुत्तेमवार, अरुण आमिडवार व निखिल आमिडवार यांनाही भागीदारी देण्यात आली. पण, २०१६ मध्ये डॉ. पालतेवार व चक्करवार यांना वगळून सर्वजण कंपनीतून बाहेर पडले. सध्या रुग्णालयात पालतेवारकडे ६७ आणि चक्करवार यांच्याकडे ३३ टक्के भागीदारी आहे.

पत्नीला बनवले अतिरिक्त संचालक

स्वत:कडे ६७ टक्के भागीदारी आल्यानंतर डॉ. पालतेवारने संचालक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तात खोडतोड करून पत्नी सोनाली पालतेवार यांना अतिरिक्त संचालक करून घेतले. तसेच विविध शासकीय कामाच्या ठिकाणी कंपनी केवळ स्वत:च्या मालकीची असल्याचे दाखवून भागीदाराची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून होण्याची शक्यता आहे.

Story img Loader