मेडिकलच्या सुरक्षा जवानाचा प्रताप

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अतिदक्षता विभागात एका खासगी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ नियमबाह्य़पणे रुग्णाचे नमुने घेत असल्याची तक्रार करणाऱ्या दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकालाच येथील सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. या नातेवाईकाच्या रुग्णाला रात्री वार्ड क्रमांक ४७ मध्ये  हलवल्यावर तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला.

यशोधरा जगदीश असे मृत रुग्णाचे नाव आहे. तिच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता वार्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू होते. सोमवारी तिच्या शेजारील दुसऱ्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी नियमबाह्य़रित्या एका खासगी प्रयोगशाळेचा तंत्रज्ञ तेथे आला. अतिदक्षता विभागात होणारा हा प्रकार बघून यशोधरा यांच्या नातेवाईकाने ही माहिती सुरक्षा जवानाला दिली. परंतु जवानाने उलट तक्रारकर्त्यांच्याच कानशिलेत लगावली. या प्रकाराची पोलिसांत  तक्रार दिली. अजनीतील ठाण्यातील पोलीस कर्मचारी येथे पोहचला.

पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जवानासह खासगी तंत्रज्ञावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांनी तक्रारकर्त्यांला तुझ्यावरच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल होणार असल्याचीतंबी दिली. पोलिसांसह मेडिकलला सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांची

भूमिका बघून या नातेवाईकाला धक्काच बसला. त्याने तक्रार करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले. परंतु सायंकाळी उशीर झाल्याने कुणीही भेटले नाही. दरम्यान, त्याच्या महिला रुग्णाला अतिदक्षता विभागातून आश्चर्यकारकरित्या वार्ड क्रमांक ४७ मध्ये  हलवण्यात आले.

येथे रुग्णाचा मृत्यू झाला. येथे कुणीही डॉक्टर नसल्याने नातेवाईकांनी परिचारिकेला जाब विचारण्यासाठी गाठले. तिने डॉक्टरांना न बोलावता सुरक्षा रक्षकांना  बोलावले. मृत महिलेच्या नातेवाईकासह समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अधिष्ठाता कार्यालय गाठले. परंतु  ते भेटले नाहीत. अखेर त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांना तक्रार दिली. परंतु या घटनेमुळे मेडिकलमध्ये खासगी प्रयोगशाळेच्या दलालांचे  काम आजही सर्रास सुरू असल्याचे पुढे आले आहे. लोकसत्ताने या दलालांचा व्यवहार कसा चालतो, हे वृत्त मालिकेद्वारे पुढे आणले होते, हे विशेष.

मेडिकलच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग

‘‘ समता सैनिक दलाकडून याबाबतची तक्रार पुराव्यासह करण्यात आली होती. दोषींवर कारवाई करण्याएवजी दोष दाखवणाऱ्यालाच मारहाण करण्यात आली. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांचाही या कामात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. तातडीने संबंधितावर कारवाईची गरज आहे.’’ – अनिकेत कुत्तरमारे, समता सैनिक दल.