नागपूर : मेडिकल रुग्णालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली उत्सवासाठी प्रशासनाने पदवी-पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांकडून विशिष्ट रकमेची वसुली करत ते न भरणाऱ्यांची कागदपत्रे रोखल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २८ जुलैच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने शुक्रवारी विद्यार्थ्यांना शुल्काची अट न ठेवता प्रमाणपत्र दिले.
प्लॅटिनम ज्युबिली उत्सवासाठी शिक्षकाला १२ हजार, पदव्युत्तर विद्यार्थ्याला ८ हजार, पदवीच्या विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले होते. या शुल्काची सक्ती करत ते न भरणाऱ्यांसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अटेम्ट सर्टिफिकेट, क्रिडिट होर्स सर्टिफिकेट, एनएमसी रिकग्नेशन सर्टिफिकेटसह सगळीच कागदपत्रे रोखली होती. लोकसत्ताने या प्रश्नाला वाचा फोडताच प्रशासनाला जाग आली. विद्यार्थ्यांना लगेच प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले.
मेडिकल प्रशासनाला जाब मागितला
‘लोकसत्ता’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण खात्याने मेडिकल प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची माहिती देण्याची सूचना केली. कोणालाही शुल्काची सक्ती करता येत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात मेडिकलकडून उत्तर आल्यावर पुढील कारवाई नियमानुसार केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.