यवतमाळ : केंद्रीय पर्यटन मंत्रालय समितीची सदस्य असल्याची बतावणी करून या विभागांतर्गत विविध योजना, कंत्राटे मिळविण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवत अनेकांची कोट्यवधींनी फसवणूक करणारी महाठग मीरा प्रकाश फडणीस (रा. बालाजी सोसायटी, यवतमाळ) हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ फेब्रुवारीला फेटाळला. वर्षभरापूर्वी पोलिसांनी अटक केल्यापासून मीरा फडणीस कारागृहात आहे. यापूर्वी यवतमाळ जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.

 महाराष्ट्रातील यवतमाळ, नागपूर, मुंबईसह उत्तरप्रदेशातील बनारस, लखनऊपर्यंत नेटवर्क असलेल्या या हायटेक टोळीतील यवतमाळ येथील मीरा फडणीस व लखनऊ येथील तिचा साथीदार अनिरूद्ध होशिंग यांनी विदर्भातील सुमारे ७० जणांची जवळपास आठ कोटी रुपयांनी फसवणूक केली. यवतमाळ येथील सचिन धकाते, अविनाश पांडे, माणिक पांडे यांच्यासह शहरातील जवळपास दहा जणांची कोट्यवधींची फसवणूक केली. या प्रकरणी सचिन अनिल धकाते, रा. प्रजापती नगर यवतमाळ यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांत मीरा फडणीस, रा. बालाजी सोसायटी, यवतमाळ व अनरिूद्ध होशिंग, रा. वाराणसी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नागपूर पोलिसांनी अनिरूद्ध होशिंग याला लखनऊ येथून अटक केली होती. तर मीरा फडणीस हिला मार्च २०२४ मध्ये अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळविण्यात अपयश आल्यानंतर मीरा फडणीस कारागृहातून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होती. तिने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला. न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळत जामीन नाकारला. मीरा फडणीस हिला जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद करताना वकिलांनी विविध हायप्रोफाईल निकालांचा संदर्भ दिला. मात्र न्यायालयाने मीरा फडणीस हिचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने या प्रकरणात फसविलेल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

मीरा फडणीस हिने सत्तापक्षातील एका बड्या नेत्याची नातेवाईक व संघाची कार्यकर्ता असल्याचे सांगून अनेक गुंतवणूकदारांना भूरळ घातली. पर्यटन विभागात गाड्या भाड्याने देणे आणि रेल्वेत लिनन क्लिनिंगच्या कंत्राटाद्वारे मोठ्या कमाईचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांनी कर्ज काढून कोट्यवधी रुपयांची (बँक ट्रांझेक्शनच्या माध्यमातून) गुंतवणूक केली. मात्र परतावा मिळण्यास टाळाटाळ होत असल्याने या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतणूकदारांमध्ये खळबळ उडाली. आता या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात असून गुंतवणूकदार पैसे परत मिळतील, ही अपेक्षा बाळगून आहेत.

मुलीवर कारवाई करण्याची मागणी

मीरा फडणीसची मुलगी शर्वरी फडणीस हिच्या बँक खात्यात देखील अनेक गुंतवणूकदारांनी रक्कम जमा केली. त्यामुळे ती सुद्धा या फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात शर्वरी फडणीस हिच्या विरोधात अद्यापर्यंत पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आश्चर्य व्यक्त केले असून तिच्यावरही कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Story img Loader