चार वर्षे मनोरुग्णालयात उपचार
शेतमजूर पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांसह स्वत:चे काय होईल, या विवंचनेत एका महिलेला मानसिक आजाराने ग्रासले. याच अवस्थेत तिने घर सोडले. ती नागपुरात आली. पोलिसांनी तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर चार वर्षे उपचार करण्यात आले. त्यात ती बरी झाली. मागील आठवडय़ात तिला तिच्या मुलांच्या स्वाधीन करण्यात आले.
लीलावती (बदललेले नाव) असे ५८ वर्षीय महिलेचे नाव आहे. ती छत्तीसगडच्या नैला-भाटापारा, जि. जांजगीर (चांपा), येथील रहिवासी आहे. सहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिचा एक मुलगा बारा वर्षांचा व दुसरा चौदा वर्षांचा होता. पतीच्या निधनानंतर आता कुटुंबाचे काय होईल, या काळजीमुळे तिचे मानसिक संतुलन ढासळले. याच अवस्थेत तिने घर सोडले. रेल्वेस्थानकावर उभ्या एका गाडीत बसून प्रथम ती एका अनोळखी गावी उतरली. कालांतराने ती नागपुरात पोहोचली.
रस्त्यांवर फिरत असताना तिला एका वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. मेडिकलमध्ये तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात
आली. चालता येत नसतानाही तिने वार्डातून पळ काढला. यशोधरा नगर पोलिसांना ती आढळली. त्यांनी तिची विचारपूस केल्यावर तिला मानसिक आजार असल्याचे स्पष्ट झाले. तिला १९ सप्टेंबर २०१५ ला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्या पायावर उपचार करण्यात आले.
प्रदीर्घ उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मानसिकरित्याही ती सावरली. तिला तिच्या मुलांची आठवण येऊ लागली, परंतु तिला घरचा पत्ता सांगता येत नव्हता. ती डॉक्टरांना घरी पाठवण्याची विनंती करत होती. रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षकांनी तिच्याशी संवाद साधत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवडय़ात तिला गावाचा पत्ता आठवला. रुग्णालय प्रशासनाने तेथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना महिलेशी मोबाईलवर बोलायला लावले. त्यानंतर तिचे दोन्ही मुले व भासरे नागपुरात आले. महिलेला सोबत घेऊन गेले.
पोलिसांनी आर्थिक आधार दिला
महिलेच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यावर त्यांच्याकडे नागपूरला येण्यासाठी पैसे नव्हते. छत्तीसगडमधील जांजगीर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर कुटुंब नागपूरला पोहोचले. महिलेला तिच्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणण्यासाठी मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात, डॉ. प्रवीण नवखरे, डॉ. अनघा सिंग, अनघा राजे मोहरील यांची भूमिका महत्त्वाची होती.
‘‘मानसिक आजार हा औषधोपचाराने बरा होतो, परंतु या रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी कुटुंबीयांच्या मानसिक आधाराचीही गरज आहे. कुटुंबीयांनी या रुग्णांची विशेष काळजी घेतल्यास त्यांचे सामाजिक पुनर्वसन शक्य आहे.’’
– अनघा राजे मोहरील, सामाजसेवा अधीक्षक,प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.