वर्धा : एखादा प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचा ठरला की मग लोकप्रतिनिधीस सदा दक्ष असणे आवश्यक ठरते. जाब विचारणारी जनता आमदाराची पण झोप उडवून देते. येथे प्रश्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा. वर्धा नव्हे तर हिंगणघाट येथेच वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून अभूतपूर्व आंदोलने झालीत. त्यावर प्रसंगी आमदारकी सोडेल पण हे कॉलेज आणणारच, असा रोखठोक पवित्रा आमदार समीर कुणावार यांनी घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मंजुरी पण दिली. मात्र निवडणूक पाहून मंजुरी दिली, मात्र साधा दगडदेखील लागला नाही, असा आरोप विरोधक जाहीरपणे करू लागल्याने कुणावार जिद्दीस पेटले.
तीन दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना ते म्हणाले होते की, काय आरोप होतात ते होवू द्या, पण मी पाठपुरावा करीत असून बुधवारी बैठक लागणार, असे त्यांनी स्पष्ट करून टाकले. त्यांचा शब्द वरिष्ठांनी पाळला. अखेर आज सायंकाळी वैद्यकीय महाविद्यालयासाठीची बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ती आटोपल्यावर सर्वप्रथम ‘लोकसत्ता’सोबत संवाद साधताना कुणावार यांनी घडामोड कथन केली. या बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयरही उपस्थित झाले.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी कृषी विभागाची जागा आधीच मंजूर झाली. मात्र हस्तांतर झाले नाही. कृषी विभागाच्या फळझाड विभागाची ही जागा सुपूर्द करण्याची जबाबदारी कृषी सचिव यांना सोपविली असून त्यांनी पुढील दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची खात्री या सभेत मिळाली. निधी केंद्र व राज्य शासन देणार, आणि तो मंजूर पण झाल्याचे आदेश तयार आहेत. आमदार कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की या महाविद्यालयात कॅन्सर युनिट द्या. ते ओके झाले. तेच पत्र या बैठकीत ठेवण्यात आले. तेव्हा प्रधान सचिवांनी त्यास मंजुरी दिली.
सर्वात महत्त्वाची बाब या महाविद्यालायचे सूत्र कोण सांभाळणार, हा होता. ‘डीन’ दिले पण ते मर्यादित अधिकार असलेले आहेत. पण अडचणी कोण सोडवणार हा प्रश्न कुणावार यांनी उपस्थित केला. तेव्हा मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे काम अडचणमुक्त व्हावे म्हणून एक विशेष प्रशासकीय अधिकारी नेमण्याची सूचना केली. ती मान्य झाल्याने आता पदोपदी लक्ष घालावे लागणार नाही, अशी भावना कुणावार व्यक्त करतात. हे महाविद्यालय ‘ग्रीन फिल्ड’ श्रेणीत घेण्यात आले आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारत अनिवार्य ठरते, असे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्याचे भूषण ठरणार असल्याने कुठेही अडचण येणार नसल्याची खात्री बैठकीत दिली. आमदार कुणावार म्हणाले की हे महाविद्यालय व सोबतच नर्सिंग कॉलेज अस्तित्वात येणे हीच माझ्या राजकीय कारकिर्दीची खरी उपलब्धी राहणार.