नागपूर : प्रदेश काँग्रेस समिती अद्याप जाहीर झाली नसली तरी त्या बाबतची माहिती बाहेर आली असून त्यात नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांना स्थान नसल्याने शहर काँग्रेस असंतोष निर्माण झाला आहे. नाराज नेत्यांनी सोमवारी माजी आमदार एस. क्यू. जमा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यात पटोले यांची तक्रार पक्षश्रेष्ठी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रदेश प्रतिनिधी म्हणून विलास मुत्तेमवार, अविनाश पांडे, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, अनीस अहमद, रामकिशन ओझा, पुरुषोत्तम हजारे, गिरीश पांडव, बंटी शेळके, प्रशांत धवड, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, दीपक काटोले, राजकुमार कमनानी यांच्या नावाचा समावेश आहे.

ही यादी उघड होताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला. बूथ ते शहर स्तरावर कुठल्याही निवडणुकीशिवाय प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हा प्रकार निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा आहे.

नाना पटोले नागपूर शहरातून काँग्रेस संपवत आहेत, असा आरोप यावेळी नाराजांनी केला. त्यांचे एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीत जाऊन प्रमुख निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री तसेच इतर बड्या नेत्यांना भेटणार आहेत. या बैठकीला तानाजी वनवे, जिया पटेल, के.के. पांडे, हुकूमचंद आमधरे, चंद्रपाल चौकसे, वसंत गाडगे, किशोर जिचकार, संजय कडू, संजय दुबे, शकूर नागानी, कमलेश समर्थ, खान नायड आदी उपस्थित होते.

Story img Loader