चंद्रपूर : अदानी समूहाच्या अंबुजा व एसीसी तसेच अल्ट्राटेक, माणिकगड आणि मुरली सिमेंट या पाच कंपन्यांच्या व्यवस्थापनाद्वारे अधिकारी व कामगारांना कुठलीही नोटीस न देता तोंडी आदेशान्वये नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तथा कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी, २८ ऑक्टोबरला भव्य जाहीर सभेचे आयोजन केले असल्याची माहिती माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील पाचही सिमेंट कंपन्यांकडून अधिकारी व कामगारांवर कशाप्रकारे अन्याय होत आहे याची सविस्तर माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रपरिषदेत दिली. उपरवाही येथे शनिवार २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मराठा अंबुजा सिमेंट वर्क्स, कामगार संघटना कार्यालयाचे पटांगणात ही सभा होत आहे. या सभेचे अध्यक्ष कामगार नेते नरेश पुगलिया आहेत. मार्गदर्शक इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, बल्लारपूर पेपर मिलचे महासचिव वसंत मांढरे, कार्याध्यक्ष तारासिंग कलसी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – मराठा आरक्षण देणारच, उदय सामंतांचे आश्वासन, म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या टीका-टोमण्यांचा…’

हेही वाचा – महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, अनेक जिल्ह्यांत थंडीची चाहूल

अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीत १८० अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी ९० अधिकाऱ्यांना काढण्याचे षडयंत्र कंपनीने आखले आहे. यातील १९ जणांना तोंडी सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. तसेच ठेकेदारी कामगारांच्या पगारवाढीसंदर्भत व्यवस्थापनाकडून टाळाटाळ सुरू आहे. बोनस दिला गेला नाही, कामगारांना पदोन्नती व वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी, १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना, लेखी आदेश न देता तोंडी आदेशावर बळजबरीने दमदाटी करून राजीनामा देण्यास दबाव टाकला जात असल्याचा आरोप पुगलिया यांनी केला. कामगारांचा मानसिक छळ केला जात आहे. अंबुजा सिमेंट कंपनीने ज्यांची जमीन अधिग्रहीत केली त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली गेली. त्या सर्वांचे काम चांगले असताना त्यांना कामावरून कमी केले जात आहे, कामगारांना धमक्या मिळत आहे, कामगारांचे सर्व विषय घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही जाहीर सभा आयोजित केली असल्याची माहिती पुगलिया यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of naresh puglia against five cement companies rsj 74 ssb