यवतमाळ : नववर्षाच्या आगमनास काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष जल्लोषात साजरे करण्यासाठी नागरिकांसह हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट सज्ज झाले आहेत. मात्र नववर्षाचे स्वागत करताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववर्ष साजरे करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी पोलिसांनी हॉटेल आणि ढाबा मालकांना काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. येथील पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील सर्व हॉटेल, ढाबा मालकांची बैठक घेण्यात आली. त्यात नववर्ष साजरे करताना काय करावे आणि काय करू नये, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नववर्ष जल्लोषात साजरे करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, काही समस्या उद्भवल्यास तत्काळ मदत कशी मिळवावी, याचाही सल्ला देण्यात आला.

हेही वाचा – सुनील केदारांची कारागृहात रवानगी, जामिनावर ३० डिसेंबरला निर्णय

हेही वाचा – वाशिम : आश्चर्य! पर्यटन विकासाच्या नावावर कोट्यवधीची उधळण, पर्यटन नसलेल्या ठिकाणासाठीही…

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. बहुतांश नागरिक हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यावर नववर्ष साजरे करण्यासाठी जातात. त्यामुळे प्रत्येक हॉटेल व ढाब्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, कुठे अपघात घडल्यास अपघातातील जखमींना तत्काळ मदत करावी, महामार्गावर व इतर कुठल्याही रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये याबाबत सूचना द्यावी, हॉटेल व ढाबा वेळेत बंद करावा, या ठिकाणी मार्गदर्शक सूचना लावाव्यात, वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, अत्यावश्यक मोबाइल क्रमांक, ज्यामध्ये अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस यांचे क्रमांक असणारे फलक दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी बैठकीत दिल्या. यापुढे पोलीस आणि सर्व ढाबा चालक-मालकांची दर तीन महिन्याला बैठक घेण्याबाबत पोलीस अधीक्षक बनसोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of yavatmal sp with hotel owners in view of new year celebrations nrp 78 ssb