लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर व विदर्भात दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपचे स्टार प्रचारक व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मंगळवारी नागपुरात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी नागपूर ग्रामीणमध्ये दोन सभा होणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपच्या प्रचारातील भव्य-दिव्यता दृश्य स्वरूपात दिसत असली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा संयमी प्रचारही प्रभावीपणे सुरू आहे. प्रचारासाठी केवळ आठ दिवस असल्याने युती आघाडीच्या बड्या नेत्यांचे दौरे नागपूर व ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आले आहे. ‘कटेंगे तो बटेंगे’या घोषणेचे प्रणेते योगी आदित्यनाथ यांच्या मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आवारी चौकात (मध्य व दक्षिण नागपूर मिळून) सभा होत आहे. मध्य हा मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे तर ज्या भागात ही सभा होत आहे तेथे जवळच संघाचे हेडगेवार स्मृती भवन असल्याने तेथे योगी काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आणखी वाचा-पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १७ नोव्हेंबरला नागपूर जिल्ह्यात दोन सभा आहेत. काटोलमध्ये सकाळी ११ वाजता, तर सावनेरमध्ये दुपारी १२.३० वाजता ते सभा घेणार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे नाही. काटोलमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात आहेत तर सावनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागा भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे सावनेर व काटोलमध्ये शहा काय बोलतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीतही शहा यांनी सावनेर मतदारसंघात सभा घेतली होती. पण, तेथे भाजपचा पराभव झाला होता, हे येथे उल्लेखनीय.
काँग्रेसचे काय ?
काँग्रेस नेत्यांच्या सभा होत असल्यातरी त्याचा गाजावाजा होताना दिसत नाही. छत्तीसग़डचे माजी मुख्यमंत्री भूषेशकुमार बघेल नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. छोट्या छोट्या सभांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण नागपूर आणि जिल्हा पिंजून काढला आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी मंगळवारी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तर गोंदिया या नक्षलप्रभावीत जिल्ह्यात प्रचार सभा घेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सुद्धा मंगळवारी नागपूर दौऱ्यावर आहेत.
© The Indian Express (P) Ltd