३६ तासांत विमानाची हुबेहुब प्रतिकृती
एका आदिवासी मुलीने भारतीय वायुसेनेच्या मालवाहू विमानाची हुबेहुब प्रतिकृती तयार करून, राष्ट्रीय पातळीवर तिची दखल घेण्यास भाग पाडले. राजस्थानमधील जोधपूर येथे अखिल भारतीय वायुसैनिक शिबिरातील स्पध्रेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना तिने ही कामगिरी पार पाडली.
भंडारा जिल्ह्य़ातील साकोलीच्या मेघा टेकामच्या वडिलांचे नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडय़ात मिठाईचे दुकान आहे, तर आई गृहिणी आहे. बारावी विज्ञानची विद्यार्थिनी मेघा अभियांत्रिकीचे स्वप्न घेऊन नागपुरात आली. विमानांनी तिला मोहात पाडले. लाकडाच्या ठोकळ्यांना येत असलेला पंखांचा, शेपटाचा आकार पाहून तिनेही हातात सँडपेपर घेतला आणि विमानाचे सुटे भाग तयार करायला सुरुवात केली. इथे आल्यानंतर घेतलेला पहिला धडा तिच्या कामात आला आणि तिच्यातील चिकाटी आणि मेहनत एअरो मॉडेलर इन्स्ट्रक्टर राजेश जोशी यांनी हेरली. ‘सुखोई’ या विमानाची मेघाने तयार केलेल्या पहिल्या प्रतिकृतीने तिच्यातील उच्च दर्जाचे कौशल्य समोर आले. त्यातूनच राजेश जोशी यांनी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अखिल भारतीय वायुसैनिक शिबिरातील स्पध्रेसाठी तिला पाठवण्याचे निश्चित केले. विंग कमांडर पी. ए. अय्यर यांनीही तिला प्रोत्साहन दिले.
भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पध्रेसाठी प्रत्येक राज्यातून दोन छात्रसैनिकांची निवड केली जाते. त्याआधी विभाग पातळीवर स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पध्रेसाठी पाठवले जाते. नागपूर, पुणे, मुंबई विभागात आयोजित स्पध्रेत मेघाने पहिला क्रमांक पटकावला आणि राजस्थानमधील जोधपूर येथे ८ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित स्पध्रेत ३६ तासांत भारतीय वायुसेनेच्या विमानाची प्रतिकृती बनविण्याचे लक्ष्य तिने साध्य केले.
‘एनसीसी’च्या स्थापनेपासून पहिल्यांदा एका आदिवासी मुलीने एअरो मॉडेलिंगच्या क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी केल्याचा सार्थ अभिमान आहे. या स्पध्रेसाठी तिने घेतलेली मेहनत एकाग्रता आम्ही पाहिली आहे. या स्पध्रेसाठी तिने विमानाच्या तब्बल सहा प्रतिकृती तयार केल्या.
-राजेश जोशी, एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर