बुलढाणा : पोटच्या पोराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण हत्या करणाऱ्या पित्यास मेहकर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मेहकरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सागर मुंगीलवार यांनी हा अपराध्याना जरब बसविणारा निकाल दिला आहे.मेहकर तालुक्यातील पारडी येथे हा भीषण घटनाक्रम घडला होता. आरोपी माणिक केशव राठोड ( राहणार पारडी तालुका मेहकर ) हा कौटुंबिक वादापायी पत्नी व मुलगा रवी राठोड यांच्यापासून वेगळा राहत होता.

मात्र मुलगा रवी हा आरोपी माणिक राठोड याची मोटारसायकल वापरत होता. यातच रवीने त्याच्या वडीलांना न विचारता मोटारसायकल ही परस्पर गहाण ठेवली होती. मोटारसायकल गहाण ठेवल्याच्या कारणावरून नेहमी बापलेकांमध्ये वाद होत होते. मोटारसायकलचा वाद इतका विकोपाला गेला की माणिक राठोड यांने २० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता उमेश दशरथ पवार (रा.पारडी ता.मेहकर) यांच्या घराजवळ रवीच्या डोक्यात लोखंडी रॉड ने वार केला . डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रवीचा मृत्यू झाला होता.सदरची घटना आरोपीच्या सुनेने पाहिली होती. याप्रकरणी माणिक राठोड याच्या विरूध्द दुसरा मुलगा व मृतक रवीचा भाऊ मंगेश माणिक राठोड यांने जानेफळ( तालुका मेहकर ) पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. माणिक राठोड याच्यावर कलम ३०२ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक मसराम यांनी तपास पुर्ण करून आरोपी विरूध्द दोषारोप पत्र मेहकर न्यायालयामध्ये दाखल केले. सदरचे प्रकरण हे सरकारी वकील पोकळे यांनी चालविले. यामध्ये सात साक्षीदार तपासण्यात आले. मेहकरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश(वर्ग -२ ) सागर मुंगीलवार यांनी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याचे निकाल पत्रात नमुद केले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.एस एम खत्री यांनी प्रभावी युक्तीवाद करीत आरोपीस कठोर शिक्षेची मागणी केली.

एकंदरीत पुरावे आणि युक्तीवाद लक्षात घेत २५ मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल मेहकर न्यायालयाने दिला आहे. यामध्ये माणिक राठोड याला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रूपये दंड, न भरल्यास ३ महिने कैदेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे.सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.पोकळे व विशेष सरकारी वकील अ‍ॅड. एस एम खत्री यांनी कामकाज केले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कर्मचारी छाया हिवाळे यांनी सहकार्य केले.