राज्याची अस्मिता व प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांबद्दल सत्ताधारी पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी अलीकडच्या काळात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी मेहकर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला दणदणीत प्रतिसाद मिळाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला.
हेही वाचा>>>नागपूर: हिवाळी अधिवेशनात वि.प. सभापतीपदाची निवडणूक होणार की टळणार?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे काही नेते, पदाधिकाऱ्यांनी अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदींबद्दल अपमानजनक विधान केल्याचा आरोप करीत मेहकर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे तेथील दैनंदिन व्यवहार, उलाढाल ठप्प झाली. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. बंद शांततेत पार पडला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त असल्याने मुख्य चौक व मार्गांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
हेही वाचा>>>नागपूर: सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ख्रिसमसला कोणता नवीन विक्रम करणार जाणून घ्या…
काँग्रेसचे श्याम उमाळकर, अनंत वानखेडे, विलास चनखोरे, पंकज हजारी, देवानंद पवार, वसंत देशमुख, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आशीष रहाटे, किशोर गारोळे, राष्ट्रवादीचे भास्कर काळे, आफताब खान, निसार अन्सारी, सागर परांडे, भीमशक्तीचे कैलास सुखदाने, तथागत ग्रुपचे संदीप गवई यासह समविचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी गावातून फेरी काढली. यावेळी बंदचे आवाहन करून महामानवांचा जयजयकार करण्यात आला. या बंदला व्यापारी, व्यावसायिक, लघु व्यावसायिकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा ठाकरे गटाचे आशीष रहाटे यांनी लोकसत्तासोबत बोलताना केला.