बुलढाणा : अचानक उद्धभवलेल्या आणीबाणीच्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रणालीवर चुकीची माहिती
देणाऱ्या मेहकर येथील ‘सर्किट’ युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने मध्यरात्री मंदिरावर हल्ला झाल्याचा संदेश ‘११२’ वर दिल्याने मेहकर पोलिसांची धावपळ झाली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नसल्याचे आढळून आल्यावर त्याने वाहने जाळून टाकण्याची धमकी दिली. यामुळे त्याच्या विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करून मेहकर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
नागरिकांना अचानक उद्भवलेल्या गंभीर घटनांची माहिती तात्काळ , आणीबाणीच्या प्रसंगात नागरिकांना मदत मिळावी या उद्धेशाने राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांना एकाच ‘टोल फ्री’ (११२) क्रमांकावर पोलिसांची मदत मिळावी असा या प्रणाली चा उद्धेश आहे. मात्र मेहकर येथील हरीश सदानंद पुरी (वय २१, राहणार राम नगर, मेहकर, जिल्हा बुलढाणा) या माथे फिरू युवकाने भलताच फायदा घेतला. त्याने ११२ वर संपर्क करीत मेहकर येथील एका मंदिरावर हल्ला करण्यात आल्याची धाधांत खोटी माहिती दिली.या प्रणालीवर नियुक्त नाईक पोलीस रमेश गरड यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहिले असता तसे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी पुरी याला फोन लावल्यावर त्याने फोन घेतला नाही. काही वेळाने त्याने पोलीस गरड यांना फोन करून ‘तुम्ही सेवा दिली नाही, तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो, उद्या माळी पेठ मध्ये वाहने जाळतो’ अशी धमकी दिली.
हेही वाचा…थंडी वाढताच अंड्याच्या दरात मोठी वाढ, थंडी आणि दरवाढीचा संबंध काय?
दरम्यान पोलीस रमेश गरड यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली.प्रकरणी मेहकर पोलिसांनी आरोपी हरीश सदानंद पुरी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२,३५१(२) नुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्रणाली
दरम्यान संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात ही सुविधा उपलब्ध आहे.यासाठी चारचाकी, दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून त्यावर ‘एमडीटी’ आणि इतर प्रणाली बसविण्यात आल्या आहे.या प्रणाली साठी २४ तास पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येतात