नागपूर : सण कोणताही असो, महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. हिंदू धर्मात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. भारतीय परंपरेत विवाह सोहळ्यात नववधुला मेहंदी काढण्याची पद्धत आहे. प्रत्येक नववधू या मेहंदीच्या विधीची अगदी आतूरतेने वाट बघत असते, मात्र नागपुरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने प्रत्येक शनिवारपासून प्रभागात ‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून हजारो महिलांच्या हातावर वेगवेगळ्या पद्धतीच्या आकर्षक डिझाईनची मेहंदी काढली जात आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्याअंतर्गत दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जात असून महिलांच्या हातावर मेहंदीचे रंग भरले जात आहेत. शहरातील विविध प्रभागांत ३०० ठिकाणी या आगळ्या वेगळ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हजारो महिला या उपक्रमाचा लाभ घेत आपल्या हातांवर मेहंदी काढून घेत आहे.
हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात १०० ते १०९ वयोगटातील ६१६ मतदार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला, साहित्य, संस्कृती व परंपरांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सण व उत्सवांना ‘सांस्कृतिक रूप’ देण्याचा उपक्रम असला तरी आगामी लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केला जात असल्याची शहरात चर्चा आहे.
हेही वाचा – वर्धा : खरेदी विक्री संघात देशमुख गटाचा झेंडा
शनिवारी या उपक्रमाची सुरुवात झाली असून ३४ ठिकाणी हा उपक्रम राबविला असून पहिल्या दिवशी ५०० पेक्षा अधिक महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटण्यात आली आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या संयोजिका मनिषा काशीकर असून गिनेज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी कलावंत सुनीता धोटे यांच्या नेतृत्वाखाली दहा ते पंधरा युवती महिलांच्या हातांवर मेहंदी काढत आहे.