सुनील व अनुपमा देशपांडे यांचे मत
बांबूकलेसोबत विविध पारंपरिक लोककलांचे स्थान म्हणून मेळघाटचे नाव समोर येत असताना कुपोषण म्हणजे मेळघाट अशी सध्या असलेली ओळख पुसणे गरजेचे असल्याचे मत सुनील आणि अनुपमा देशपांडे यांनी व्यक्त केले.
प्रयास सेवांकुर या संस्थेतर्फे बी. आर. ए. मुंडले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘अलग राह’ कार्यक्रमात बांबू कलेतील तज्ज्ञ सुनील आणि अनुपमा देशपांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काही व्यक्तींच्या सानिध्यात आपल्याला एकदम श्रीमंत असल्यासारख वाटते. निरुपमा आणि सुनील देशपांडे हे असेच एक दांपत्य. मेळघाटमध्ये गेल्यानंतर त्यावेळचे चित्र अगदी वेगळे होते. मात्र, तेथील आदिवासींसोबत राहत असताना बांबूपासून कलाकृती निर्मिर्तीचा वेगळा छंद जडला आणि त्यातून वेगवेगळ्या वस्तूंची कलाकृती तयार करण्याचे काम सुरू केले. त्यात त्या भागातील आदिवासींची मला खूपच मदत झाली. आपण त्यांना काही शिकवितो आहे असे मुळीच नाही. त्यांची बलस्थाने जवळून बघितल्यावर आपण कुठेच नाही. आपल्याला या ठिकाणी खूप काही शिकायला मिळू शकते. आदिवासींनी आम्हाला स्वीकारल्यामुळे आज आम्ही त्यांच्यामधील झालो.
१९९५ला मेळघाटमध्ये आदिवासींसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील जीवनशैली अंगिकारली. निसर्गाने उधळलेल्या तेथील बांबूला जीवनप्रवाहातील प्रमुख गुंतवणूक बनवून या दांपत्याने संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या केंद्राने तेथील स्थानिक आदिवासींच्या आयुष्याला एक निराळीच प्रतिष्ठा मिळवून दिली. बांबूपासून १५० हून जास्त प्रकारची निरनिराळी उत्पादने बनविण्याचे तंत्रज्ञान तेथील पाच हजारांहून अधिक आदिवासींना देऊन उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण करून दिले आहे. आदिवासींमध्ये परिवर्तन आणि जागृती होत आहे. तेथील मुले शिक्षण घेऊन काही करू पाहात आहेत, त्यामुळे मेळघाटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असेही देशपांडे म्हणाले.
मेळघाटातील कोरकुंनी आपले आयुष्य शेतीव्यतिरिक्त बांबूपासून बनवणाऱ्या उत्पादनाच्या व्यवसायात स्थित केले आहे. त्यामुळे त्यांना आता मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रयासचे डॉ. अविनाश सावजी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा