देशातील सर्वात मोठय़ा प्रकल्पात ६ महिन्यांचे खरतड प्रशिक्षण
भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मेळघाट परिसरातील कोरकूंची चमू सज्ज झाली असून. सहा महिन्यांच्या खरतड प्रशिक्षणानंतर ही चमू आता व्याघ्र प्रकल्पाच्या सेवेत दाखल होणार आहे.
मेळघाटातील कोरकू वाघाला कुलामामा म्हणतात आणि कुला व कोरकू यांचे अनादी काळापासूनचे ऋणानुबंध आहेत. यातूनच कुलाच्या संरक्षणासाठी कोरकूंचे सुरक्षाकवच मेळघाटात तयार झाले आहे. राज्यात पहिल्यांदाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असा प्रयोग राबवण्यात आला असून, विशेष व्याघ्र संरक्षण दलात(एसटीपीएफ) स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले. मानव-वन्यजीव संघर्षांचा आलेख गेल्या काही वर्षांत प्रचंड उंचावला आहे. हा आलेख खाली आणण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची बरीच मदत होत आहे. मेळघाटात मात्र जंगल आणि माणूस हे नाते अजूनही जपले जात आहे. त्यामुळेच कुला मामावरील शिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीला भेदण्यासाठी कोरकूंचे सुरक्षाकवच या दलाच्या रूपाने तयार करण्यात आले आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलात आतापर्यंत संपूर्ण राज्यातून जवानांची भरती केली जात होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मात्र यात स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य देण्याचे निश्चित केले. यामागील आणखी एक उद्देश म्हणजे, याच परिसरात त्यांची जडणघडण झाल्यामुळे जंगलाचा कानाकोपरा त्यांना ठावूक असतो आणि व्याघ्र संरक्षण व संवर्धनात त्यांची बरीच मदत होते. शारीरिक चाचणीतही शहरातील जवानांना लाजवणारी कामगिरी या युवक-युवतींनी केली. पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या ३० मिनिटात कापून कुला मामाच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात सुमारे ३०० गावे आहेत आणि त्यापैकी ८४ गावांचा या व्याघ्र प्रकल्पात समावेश होतो. याच क्षेत्रातील ८८ युवक-युवतींची भरती दलात करण्यात आली. कोरकूंना या दलात प्राधान्य दिल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सेमाडोह परिसरात या सर्वाचे प्रशिक्षण पार पडले.
उद्या प्रमाणपत्र वितरण
एसटीपीएफच्या प्रशिक्षणाचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण सोहोळा सोमवार, ४ एप्रिलला सकाळी १० वाजता सेमाडोह प्रशिक्षण केंद्रात होत आहे. मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण, पुणे) नितीन काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहोळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण, पुणे) मफिउल हुसेन आणि विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाचे महानिरीक्षक हिंमतसिह नेगी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, नागपूर) मेईपोकीम अय्यर उपस्थित राहतील.