शफी पठाण
नागपूर : ‘‘साहित्य अकादमी म्हणजे नुसती कंपूशाही आहे. अकादमीचे प्रचलित नियम येथे पायदळी तुडवले जातात’’ असे गंभीर आरोप करून अकादमीवर कठोर टीका करणारे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी स्वत:च अकादमीचे सदस्यपद स्वीकारले आहे. यामुळे साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून, अकादमीवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठीच पाटलांनी ठरवून ही आगपाखड केली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘कलावंत प्रतिष्ठान’कडून पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात व फेसबुकवरही एक स्वतंत्र ‘पोस्ट’ लिहून विश्वास पाटील यांनी साहित्य अकादमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. ‘‘साहित्य अकादमीतल्या गटबाजीमुळे राष्ट्रीय स्तरावर शिवाजी सावंत, अण्णाभाऊ साठे अशा अनेक ज्येष्ठ लेखकांचे नुकसान झाले. पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून ते मुद्दाम केले गेले. अनेकांचे पद्धतशीर वाङ्मयीन खच्चीकरण केले’’ असा दावाही त्यांनी केला होता. इतकेच नव्हे, तर अकादमीतील कर्त्यां मंडळींची तुलना त्यांनी चंदनाच्या झाडावरील सापाशी केली होती. अकादमीवर असे गंभीर आरोप करतानाच ‘‘मी माझ्या अल्पस्वल्प साहित्य सेवेमध्ये पूर्ण समाधानी आहे. प्रथमपासूनच अशा गटांच्या वाऱ्यालाही उभे राहायचे मी नाकारले’’ असेही त्यांनी नमूद केले होते. मात्र, आता अकादमीचे सदस्यपद स्वीकारल्यामुळे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
साहित्य अकादमीच्या फांदीला चिकटून राहणाऱ्यांचा ‘उद्धार’ करणारे विश्वास पाटील स्वत: या तीस वर्षांत अकादमीच्या कोणत्याच समितीवर नव्हते का, तेव्हा अकादमीतील चुकीचे प्रकार त्यांना का खुपले नाहीत, अकादमीचा कार्यकाळ संपत असतानाच ते का बोलेले, याआधी न बोलण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का, असे प्रश्नही साहित्य वर्तुळातून विचारले जात आहेत.
फेसबुकवरील ‘पोस्ट’ गायब
विश्वास पाटलांनी साहित्य अकादमीच्या कार्यशैलीचे वाभाडे काढणारी ‘पोस्ट’ लिहिल्यानंतर ती समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात पसरली. ‘‘अति झाले आणि हसू आले, या न्यायाने कोणीतरी जोखीम पत्करून गळय़ातली घंटा वाजवणे गरजेचे होते. त्यामुळे दुर्दैवाने हे धाडस करावे लागले’’ असे पाटलांनी या पोस्टमध्ये लिहिल्याने अनेकांनी त्यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुकही केले होते. परंतु, विश्वास पाटलांची साहित्य अकादमीवर निवड होताच अनेकानेक कौतुकांनी ‘गौरवलेली’ त्यांची ‘धाडसी’ पोस्ट अचानक फेसबुकवरून गायब झाली आहे.
महाराष्ट्रातून जी नावे साहित्य अकादमीकडे पाठवण्यात आली त्यात माझे नाव नव्हते. कंपूशाहीने ते जाऊच दिले नाही. माझी निवड अकादमीच्या अध्यक्षांनी स्वत:च्या अधिकारात केली आहे आणि ती अर्थातच माझ्या वाङ्मयीन कर्तृत्वाकडे पाहून करण्यात आली आहे. शिवाय, फेसबुकवरील ‘पोस्ट’ माझ्या नियुक्तीचा आदेश निघाल्यानंतर लिहिली आहे. पण, अकादमीची पूर्ण कार्यकारिणी बदलत असल्यानेच मी सदस्यपद स्वीकारले. नव्या कार्यकारिणीत कंपूशाहीला अजिबात स्थान नसेल. – विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक