दसऱ्याच्या दिवशी नागपुरात होणारे दोन कार्यक्रम साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणारे असतात. दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा महोत्सव. दोन्ही कार्यक्रमात कोण काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असते. यावेळी या दोन्ही कार्यक्रमात व्यक्त झालेली मते अनेकांना विचार करायला लावणारी आहेतच, पण अनेक प्रश्न उपस्थित करणारीही आहेत. दीक्षाभूमीचा कार्यक्रम देशभरातील लाखो बौद्ध बांधवांसाठी श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे कायम मतांचा विचार करणारे राज्यकर्ते हा कार्यक्रम कधीच चुकवत नाहीत. यानिमित्ताने भरभरून घोषणा करून या बांधवांना आपलेसे कसे करून घेता येईल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो, तर या कार्यक्रमाचे आयोजक यानिमित्ताने सरकारकडून आणखी काय पदरात पाडून घेता येईल, या विवंचनेत असतात. गेल्या अनेक वर्षांंपासून हेच सुरू आहे. यावेळी स्मारक समितीने सरकारकडे सध्याची जागा कमी पडते, असे कारण समोर करून आणखी जागेची मागणी केली. आता समितीला दीक्षाभूमीला लागून असलेली आरोग्य खात्याची जागा हवी आहे. दीक्षाभूमीवर दरवर्षी या दिवशी पाच लाख लोक जमतात. त्यांना सध्याची जागा अपुरी पडते. त्यामुळे अनेकांना रस्त्यावर रात्र काढावी लागते. कितीही सोय केली तरी अनेकांचे अन्नपाण्याविना हाल होतात. मात्र, डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले अनुयायी कधीही या गैरसोयीची तक्रार करीत नाहीत. त्यांच्या या मौनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजकांनीच या अव्यक्त तक्रारीची दखल घेऊन जागा मागणे आश्चर्यकारक आहेच, शिवाय जागेचा मोह प्रगट करणारी आहे.
मुळात दीक्षाभूमीच्या जागेवर गेल्या काही वर्षांत महाविद्यालयांच्या अनेक इमारती उभ्या राहिल्या. या इमारतींची संख्या दरवर्षी वाढतच आहे. मैदानाच्या कडेकडेला उभ्या राहणाऱ्या या इमारतींमुळे दीक्षाभूमी हळूहळू आकुंचित पावू लागली आहे. दीक्षाभूमीवर दरवर्षी वाढणारी गर्दी व मंदगतीने कमी होत जाणारी जागा यामुळे गैरसोयीला वाव मिळू लागला आहे. हे वास्तव आयोजकांच्या लक्षात येत नाही, असे नाही. तरीही त्याकडे डोळेझाक करून नवी जागा मागणे योग्य आहे का? महाविद्यालय चालवणे व दीक्षाभूमीची देखभाल करणे, हे पूर्णपणे वेगवेगळे विषय आहेत. त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न आयोजक का करीत आहेत? दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो लोकांना राहता यावे म्हणून या महाविद्यालयांची दारे कधीच उघडली जात नाहीत. उलट, या परिसरात असलेले इतर शाळा व महाविद्यालये मात्र बौद्ध बांधवांसाठी उघडण्यात येतात, असा आजवरचा अनुभव आहे. आम्ही आमच्या बांधवांना कोणतीच सेवा देणार नाही, सरकार व इतर संस्थांनी त्यांची दारे उघडी करावी, जागा द्यावी, ही आयोजकांची भूमिका कुणालाही पटणारी नाही. एकीकडे शैक्षणिक व्याप वाढवत न्यायचा व दुसरीकडे जागा कमी पडते, अशी ओरड करायची, हा दुटप्पीपणा झाला. दीक्षाभूमी हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हायलाच हवे, यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यायचा, समितीने मात्र काहीच करायचे नाही, हे योग्य नाही.
संघाच्या दसरा मेळाव्यातील सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणाकडे यावेळी देशाचे लक्ष होते. त्यांनी सध्या गाजत असलेल्या दादरीच्या घटनेचा थेट उल्लेख केला नाही, पण अशा लहान घटनांना अतिरंजित रूप देऊ नये, असे आवाहन केले. यावरून दिवंगत आर.आर.पाटलांची आठवण अनेकांना झाली. त्यांनीही मुंबईवरील हल्ल्याला लहान घटना म्हणून संबोधले होते. त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला. भागवत मंत्री नाहीत व निवडूनही आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, पण दादरीची घटना खरोखरच लहान होती का, असा प्रश्न मात्र आता अनेक विचारी मनांना पडला आहे. घरात गोमांस आहे, या नुसत्या संशयावरून एखाद्याला दगडाने ठेचून ठार मारणे ही घटना क्षुल्लक व लहान कशी ठरू शकते? ज्या उन्मादातून हा प्रकार घडला तो वाढवण्यात सध्याचे राज्यकर्ते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवून असणाऱ्या सांस्कृ तिक संघटना अजिबात जबाबदार नाहीत, असे संघाला सुचवायचे आहे का, असा प्रश्न अनेकांना या भाषणानंतर पडलेला आहे. हा उन्माद ज्या झुंडीतून जन्माला येतो, त्या झुंडीला कोणताही विवेक नसतो. अशा झुंडी व गर्दीला विधायक विचाराचे वळण लावण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. कुणी काय खावे व काय खाऊ नये, हा विचार विधायक कसा असू शकेल? संघाच्या परिवारातील घटक आहोत, असे अभिमानाने सांगणाऱ्या अनेक संघटना सध्या गाय व गोमांस यावरून आगखाऊ भाषा करीत आहेत. देशातील सारे प्रश्न संपले असून फक्त हाच एक प्रश्न शिल्लक आहे, असे भासवले जात आहे. यातून जन्म घेणाऱ्या उन्मादाला जबाबदार कोण? या संघटनांना कुणी आवरायचे? यावर संघ व्यक्त झाला असता तर बरे झाले असते. प्रमुखाने एकात्मतेची भाषा बोलायची आणि अनुयायांनी खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगायचे, हा दुटप्पीपणा झाला. ज्या दिवशी भागवत बोलले, त्याच दिवशी याच शहरात प्रवीण तोगडीया सुध्दा त्याच्या अगदी विपरीत बोलले. यातले खरे कोण? कुणाचे वक्तव्य मनावर घ्यायचे?, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. समाजातील सहिष्णू वातावरणाला नख लावण्याचे प्रकार जाणीवपूर्वक केले जात असतील आणि तरीही संघप्रमुख दादरीच्या घटनेला लहान संबोधत असतील तर या परिवाराचा खरा चेहरा कोणता? एकीकडे विकासाची भाषा करायची व दुसरीकडे समाजात फूट पाडण्याचे उद्योग करायचे, हे प्रकार नव्या पिढीला मान्य होणारे नाहीत, हे या परिवाराला कळत नसेल का? समाजात दुहीचे विष पेरून कधीच प्रगती होत नाही, हे सर्वसामान्यांना समजणारे वास्तव या परिवाराला कधी कळणार? ही प्रक्षोभक भाषा, त्याची अनुल्लेखाने घेतली जाणारी दखल राज्यकर्त्यांच्या विकासविषयक धोरणांवर पाणी फेरणारी आहे, याची जाणीव या परिवाराला नसेल का, असे अनेक प्रश्न या कार्यक्रमातून निर्माण झाले आहेत. देशातील हिंदू बळकट झाले म्हणजेच प्रगती व विकासाचा मार्ग मोकळा झाला, हा विचारच मागास आहे, हे संघाला आणि केवळ राज्यकर्त्यांकडे हात पसरवून बौद्ध बांधवांची प्रगती होत नाही, हे वास्तव समितीला कधी कळणार?
– देवेंद्र गावंडे