अकोला : मराठी साहित्यिक चळवळीचा विस्तार करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची घटना अकोला येथे १९१२ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात साकारण्यात आली.
अकोल्यातील साहित्य संमेलन हे चळवळीला पुढची दिशा देणारे ठरले. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने अकोल्यातील संमेलनाच्या आठवणींना उजाळा मिळाला. वऱ्हाड प्रांताची विद्या परिषद १९१२ मध्ये अकोला येथे भरणार होती. त्यानिमित्त अकोल्यात महाराष्ट्राची साहित्य परिषद भरवावी, असा विचार सामाजिक चळवळीचे धुरीण, साहित्यिक व प्रबोधनकार वि. मो. महाजनि यांनी मांडला.
त्याकाळी ‘प्लेग’ची साथ ठरलेलीच. तसे घडू शकते, अशी चिंता होतीच. सुदैवाने तसे न होता, संमेलनाचा योग आलाच. अकोल्यात २९, ३० व ३१ ऑक्टोबर १९१२ रोजी सातवे साहित्य संमेलन भरले. स्वागताध्यक्ष वि. मो. महाजनि होते. संपूर्ण महाराष्ट्रासह इंदूर, देवास, धार, ग्वाल्हेर, काशी, प्रयाग, बडोदा, अहमदाबाद, कोलकाता, रंगून अशा सर्व ठिकाणच्या मराठी साहित्यिक व साहित्यप्रेमींना सुमारे ८०० निमंत्रण पत्रे पाठवली होती. संमेलनात सात सत्रांचे आयोजन होते. प्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी संमेलनाध्यक्ष पद स्वीकारले. त्यांचे अध्यक्षीय भाषण विचार प्रवर्तक ठरले. मराठीच्या पुस्तकांत इंग्रजी शब्दांचा भरणा होत असल्याची चिंता त्याकाळी व्यक्त झाली. ह. ना. आपटेंनी त्यावर उपाय सुचवले होते.
संमेलनाची नियमबद्ध घटना असावी, असा विचार बडोद्याला डॉ. किर्तीकर यांच्या अध्यक्षतेतील संमेलनात पुढे आला. त्याला १९१२ मधील अकोल्यातील संमेलनात निश्चित स्वरूप प्राप्त झाले. साहित्य परिषदेची घटना प्रत्यक्ष स्वरूपात आकाराला आली. हे अकोल्यातील साहित्य संमेलनाचे मोठे फलित. संमेलन दरवर्षी व्हावे, विविध प्रांतांत संमेलने घ्यावीत, संमेलनाची आर्थिक तजवीज करण्याच्या दृष्टीने कायमचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा सूचना संमेलनातून पुढे आल्या. मुंबईत कार्यालय असलेल्या परिषदेची अधिकृत घटनेसह स्थापना झाली. पहिले अध्यक्ष अकोल्याचे प्रबोधनकार वि. मो. महाजनि होते. इ. स. १९१५, १९१७ व १९२२ मध्येही अध्यक्षपदी महाजनि यांचीच निवड झाली. महाराष्ट्राचे साहित्य-सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या पुण्या-मुंबईच्या बाहेरील वऱ्हाडातील एका व्यक्तीकडे दीर्घकाळ अध्यक्षपद राहावे, हा त्यांच्या साहित्य सेवेचा, तसेच अकोलानगरीचा मोठा गौरवच ठरला.
साहित्य संमेलनात खंड पडू नये म्हणून धडपड
इ. स. १९०९ चे मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे झाले. त्यानंतर इ. स. १९१० व १९११ या वर्षी संमेलन होऊ शकली नाहीत. संमेलनात असा खंड पडू नये यासाठी अकोलेकर साहित्यिक वि. मो. महाजनि यांनी पुढाकार घेतला आणि पुढे तो सिद्धीसही आला. वि. मो. महाजनि हे स्वत: पुणे येथे १९०७ मध्ये झालेल्या पाचव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा प्रारंभ
वि.मो. महाजनि यांच्या कार्यकाळात ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ नियतकालिकाचा प्रारंभ झाला. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यावर लेखिका डॉ. पुष्पा लिमये यांनी ‘एकोणविसाव्या शतकातील प्रबोधनकार : विष्णू मोरेश्वर महाजनि’ हा ग्रंथ मेहनत व अभ्यासपूर्वक लिहिला आहे, अशी माहिती अकोल्याचे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी दिली.